Congress OBC Melawa in Islampur: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. ओबीसी मेळाव्यात बोलताना विशाल पाटील यांनी जयंत पाटील (Vishal Patil on Jayant Patil) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यामुळे दोन राजकीय घराण्यांमध्ये पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. 


वाळवा तालुक्यात शांतपणे काँग्रेस संपवला 


या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेसचा ओबीसींचा इस्लामपुरात मेळावा हे एकप्रकारे धाडस असल्याचे सांगितले. 1999 नंतर वाळव्यामध्ये काँग्रेसचे अस्तित्व क्षीण झाले असे म्हणत विशाल पाटील यांनी अप्रत्यक्ष जयंत पाटील यांना डिवचलं आहे. वाळवा तालुक्यात काँग्रेसचा विचार जपणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बापूंच्या काळातही नगरपालिका आणि पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता होती. वसंतदादांनी मोठपणा दाखवत बापूंच्या मुलांना बरोबर घेतले. मात्र, त्यांनी शांतपणे काँग्रेस संपवला अशी टीका विशाल पाटील यांनी केली. 


कौटुंबिक वाद वाढत जाणार?


राजारामबापू आणि वसंतदादा पाटील कुटुंबातील वादाची परंपरा आता या निमित्ताने पुन्हा जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्यात सुरु राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, काँग्रेसचा इस्लामपुरात मेळावा हे एकप्रकारे धाडस असल्याचे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते म्हणतात यावर नाना पटोले यांना विचारले असता, इस्लामपूर काही पाकिस्तानमध्ये नाही, भारतातच असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यामुळे इस्लामपूरमध्ये काँग्रेसचा मेळावा घेणे हे धाडस आहे, असा काही प्रश्न नाही. मात्र, ज्या पद्धतीने बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी दाबलं जात आहे, त्यामुळे आवाज बुलंद व्हावा ही काँग्रेसची भूमिका आहे, त्यासाठी हा मेळावा इस्लामपूरमध्ये घेण्यात आला असे पटोले यांनी स्पष्टीकरण दिले.


इतर महत्वाच्या बातम्या