सांगली : सांगलीत कृष्णाकाठी सकाळच्या कावळ्या उन्हात महिलांची धुणे, सुट्टीमुळे पोहण्यासाठी अबाल वृद्धांची लगबग चाललेली असते. या सर्वांचे लक्ष वेधतेय एक टोळी, ही टोळी साधी सुधी नसून दोन अडिचशे टोळीचे सदस्य एकाचवेळी कल्ला करत घिरट्या घालत नदीकाठच्या चिखलावर तुटुन पडलेले दिसतात. त्याच झालयं असं, चिमणीच्या आकाराच्या देखण्या भिंगरी पक्षांची सध्या घरटी बांधण्यासाठी धांदल उडाली आहे. हा पक्षी चिखलापासून आपले घरटे बनवतो. यासाठी चिखल जमण्यासाठी समूहाने आरडून एकच कल्ला करत पाणवठ्यावर जमतो. त्याचे चिखल चोचीत जमवतानाचे हे दृष्य एखाद्या मोठ्या टोळीने एकत्र जमून हल्लाबोल उडवून द्यावा असे आहे. आमणापूर येथील पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी भिंगरी पक्षांची ही टोळी टिपली आहे.
भिंगरी हा पक्षी अतिशय गोंडस दिसतो आणि ओळखायला अतिशय सोपा. भिंगरी नेहमी आकाशात विहरत असतो आणि हवेतल्या हवेत कीटक पकडून खाऊन टाकतो. ज्या भिंगरीला शेपटीमधून बाहेर आलेली पंखांची तार असते. त्याला तारवाली भिंगरी असेही म्हणतात. हे पक्षी सर्वसाधारणपणे कुठेही आढळतात. शिकार करून दमलेल्या या पक्ष्यांचा थवा संध्याकाळी हवेत उडताना पाहणे म्हणजे एक विलोभनीय दृष्ट्य असते. हे उड्डाण म्हणजे जणू काही एक सुंदर समूह नृत्य असते. वरखाली मागे पुढे, डावीकडे-उजवीकडे अतिशय मोहक हालचाली करत हा थवा आपापल्या घरी परत जात असतो. एखाद्या अस्सल कोरिओग्राफरला देखील जमणार नाही अशा नाजूक, डौलदार आणि तालामध्ये हे नृत्य असते. यांचे पाय नाजूक आणि लहान असतात यामुळे एखाद्या बारीक फांदीवर किंवा तारेवर घोळका करून बसलेले असतात.
काहीवेळा गरज पडली तर अगदी बेरका, बॉम्बसारखा मोठा आवाज
काही वेळा तर शेकडो भिंगऱ्या आपल्याला तारेवर बसलेल्या दिसतात. भिंगरीचा आवाज अतिशय मधुर असतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे सुमधुर संगीत तयार करतो. आणि गंमत म्हणजे हे संगीत त्याच्या शारीरिक स्थितीची अवस्था सांगते. आणि हे केवळ नर आणि मादीला लक्षात येते. काहीवेळा गरज पडली तर अगदी बेरका, बॉम्बसारखा मोठा आवाज काढून शिकारी पक्ष्यांपासून संरक्षण देखील करतो.
नर भिंगरी दिसायला अतिशय देखणा असतो. गडद चमकदार निळीशार पाठ, पांढरेशुभ्र पोट आणि केशरी तपकिरी लालसर डोक्याचा भाग. शेपटीच्या मधून तारेसारखी पिसे बाहेर आलेली असतात. यामुळे त्याला वायर टेल्ड स्वॅलो असेही म्हणतात. नराची तार जरा लांब असते आणि मादीची छोटी.
उत्तराखंडमध्ये या पक्ष्यांना शुभ मानले जाते
तर मादी भिंगरी हवेतून किडे किंवा कीटक अगदी सहज पकडतात. मोठा आ वासून हवेत उडत असतात. आणि यांच्या चोचीजवळ उलटे मागे वळलेले केस असतात. यामुळे किडे यात अडकून बसतात आणि भिंगरीला मस्त आस्वाद घेता येतो. हा पक्षी नेहमी दिसत असला तरी हिवाळ्यामध्ये मात्र ते दक्षिणेकडे जाऊन उबदार उन्हाचा आनंद घेतात. आपल्याकडे हे पक्षी उत्तराखंडातून येतात. उत्तराखंडमध्ये या पक्ष्यांना शुभ मानले जाते. हे पक्षी हवेतल्या हवेत कीटकांना खाऊन टाकतात त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. म्हणून कदाचित यांना शुभ पक्षी मानले जात असावे. तसेच या पवित्र पक्षांचा उल्लेख मुस्लिम धर्मग्रंथ कुराण मध्येही आढळतो.
हे पक्षी आपली घरटी एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये बांधतात. या पक्ष्याचे मुख्य स्थान पाण्याजवळ असते. चोचीमध्ये चिखल गोळा करून निमुळते दार असलेली घरटी बांधतात. हजारो भिंगऱ्या एकत्र घरटी बांधतात. यांना क्लिफ स्वॅलो असेही म्हणतात. वसाहतीमध्ये राहण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसांपासून संरक्षण! यामधून भिंगरी डोके बाहेर काढून बसलेली असते. हे दृश्य फारच मनोहर असते. एका वेळी तीन ते चार अंडी घालतात. ती मऊशार पिसांवर असतात. नर आणि मादी दोघेही अंड्यांचे संरक्षण करतात. ही घरटी खूप वर्षे टिकणारी असतात. शेकडो वर्षे ती टिकून राहतात. याचे कारण म्हणजे घरटी बांधताना चिखलामध्ये त्यांच्या लाळेतील चिकट रसायन त्यात मिसळले जाते आणि त्यामुळे या घरट्यांना घट्टपणा मिळतो. ही घरटी मातीच्या भांड्यांसारखी दिसतात आणि म्हणून या पक्ष्याला भांडीक असेही नाव आहे.