Sangli News : सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात (Chhatrapati Shivaray throne statue in Ashta) छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा अज्ञात शिवभक्तांनी रात्रीत बसवला आहे. पुतळा बसवण्यात आल्याचे कळताच त्याठिकाणी आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आष्टा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दत्त मंदिर समोरील खुल्या जागेत हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा अज्ञात शिवभक्तांनी बसवला.


शहरातील चव्हाणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या वतीने अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळा समिती स्थापन झाली. या समितीच्या वतीने अश्वारूढ पुतळा बसवण्याबाबत पालिकेत ठराव झाला. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे जागेची मागणी ही करण्यात आली. मात्र, अद्याप या जागेला मंजुरी मिळालेली नाही.  (Chhatrapati Shivaray throne statue in Ashta) 


पुतळ्यासाठी मान्यवरांकडून लाखो रुपयाची देणगीही देण्यात आली आहे. पुतळा समितीच्या वतीने कोल्हापूर, वारणानगर ,वडगाव यासह तासगाव, सांगली या परिसरातील पुतळ्यांची पाहणी करून कोल्हापूर येथील शिल्पकारांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चाही झाली आहे. मात्र, अद्याप शासनाने जागेला मान्यता दिली नसल्याने पुतळा उभारणीचे काम सुरू झालेले नाही. याबाबत सत्ताधारी व विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगलेला असताना रविवारी रात्री अज्ञातांनी दत्त मंदिर समोरील खुल्या जागेत असलेल्या कारंजावर छत्रपतींचा सिंहासनारूढ पुतळा बसवला. 


या ठिकाणी शिवप्रेमींसह युवकांनी गर्दी केली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुतळा कोणी बसवला याबाबत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी सुरू आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असला, तरी शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पालिका प्रशासनाने व पुतळा समितीने लवकरच शहरात छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारावा अशी मागणी होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या