Kolhapur Miraj Railway : मध्य रेल्वेकडून (Central Railway) प्लॅटफॉर्म विस्तारीकरण तसेच कोल्हापूर रेल्वे स्थानकावर इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 29 डिसेंबरपर्यंत अनेक गाड्यांवर परिणाम होणार आहे. कोल्हापूर-मिरज आणि कोल्हापूर-सांगली (Kolhapur Miraj Railway) दरम्यानच्या पॅसेंजर गाड्या गुरुवापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-नागपूर आणि कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस या गाड्या मिरजपर्यंत धावतील. मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रक जारी करून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.


रेल्वे क्रमांक 11426 कोल्हापूर ते पुणे एक्स्प्रेस गुरुवारपर्यंत मिरज ते पुणे धावेल. गाडी क्रमांक 11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर मंगळवारी आणि बुधवारी मिरजमध्ये थांबेल. बुधवारी व गुरुवारी गाडी क्रमांक 1103 कोल्हापूरहून मुंबईकडे धावणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस मिरजहून मुंबईकडे वळविण्यात येईल. 


नागपूरहून कोल्हापूरकडे मंगळवारी धावणारी नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस हातकणंगलेत थांबवली जाईल. कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस बुधवारी कलबुर्गीहून कोल्हापूरकडे धावणारी गाडी मिरज येथे थांबवली जाईल. कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस मिरजहून कलबुर्गीकडे वळवली जाईल. पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस बुधवारी पुण्याहून मिरजपर्यंत धावेल. कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर पॅसेंजर बुधवारी मिरज-सातारा-मिरजदरम्यान धावेल. 


कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा


दरम्यान, मध्य रेल्वेच्या पुणे विभाग सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली, त्यात सल्लागार सदस्यांनी सह्याद्री एक्स्प्रेस शक्य नसल्यास किमान पुणे-कोल्हापूर (Kolhapur) किंवा पुणे-बेळगाव (Belgaum) इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. 


मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले की, सह्याद्री एक्सप्रेस फेब्रुवारी 2020 पासून बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेनं रेल्वे तोट्यात चालल्याचा दावा केला होता. त्यामुळे सेवा पुन्हा सुरू करण्यास तयार नाहीत. ही ट्रेन गेली 30-35 वर्षे धावत होती आणि आता ती तोट्यात चालत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. ही एक्स्प्रेस गाडी कोल्हापूरहून रात्री 10.50 ला सुटायची आणि सकाळी 7.15 ला पुण्याला पोहोचायची. मग दुपारच्या सुमारास मुंबईला पोहोचत होती. कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर मार्गावरील प्रवाशांसाठी या वेळा सोयीस्कर होत्या. पुणे-मुंबई दरम्यान ट्रेनला प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच रेल्वे प्रशासनाने तिची सेवा बंद केल्याचे बियाणी म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या