Sangli Crime News: सांगली : अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यांमध्ये आरोपीस 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील (Walwa Taluka) कुरळप (Kurlap) येथील आश्रम शाळेत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.                                                          


वाळवा तालुक्यातील कुरळपमधील मिनाई आश्रमशाळेतील असहाय अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी संस्थाचालकासह दोघांना चार वेळा जन्मठेपेची शिक्षा इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयानं सोमवारी ठोठावली. या प्रकरणी पिडीतांकडून आलेल्या निनावी पत्राची दखल घेत पोलीसांनी पुढाकार घेऊन कारवाई केली होती. संस्थाचालक अरविंद आबा पवार (66) आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे (43, दोघे रा. कुरळप) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत. दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमातून दोघांची न्यायालयानं मुक्तता केली अत्याचारित चार पीडित मुलींना प्रत्येकी 50 हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाच्या रकमेतील नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.                           


नेमकं काय घडलं?                     


पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर 2018 मध्ये महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रावरून या अत्याचाराच्या घटनेची पोलीसांनी पोलखोल केली. त्यांनतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी मिनाई आश्रमशाळेचा संस्थापक अरविंद पवार आणि शाळेतील सहायक कर्मचारी मनीषा कांबळे अशा दोघांना पोलिसांनी अटक करुन दोघांविरुद्ध इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले होते.


न्यायालयात पीडित मुलींच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपींना दोषी ठरवून न्या. ए एस गांधी यांनी चार पिडीतांच्या तक्रारीमध्ये चार वेळा जन्मठेप आणि दंड अशी शिक्षा सोमवारी ठोठावली. चार जन्मठेपेची शिक्षा एकाचवेळी आरोपींना भोगावी लागणार आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील आणि रणजित पाटील यांनी काम पाहिलं. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे आणि महिला पोलीस सूर्यवंशी यांनी खटल्याच्या कामकाजात मदत केली.