Sangli Crime : शहरातील उल्हासनगर भागातील दुय्यम उपनिबंधक कार्यालयालगत असलेले युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्याने शुक्रवारी मध्यरात्री लोखंडी रॉडने फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून तांत्रिक पुराव्याच्या आधारे चार तासाच्या आत संशयितास लोखंडी रॉडसह जेरबंद करण्यात आले. मोन्या ऊर्फ अनिकेत गणेश व्हनकडे (वय 18, रा. हनुमाननगर, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.


कुपवाडमध्ये दुय्यम उपनिबंधक कार्यालयालगत युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन आहे. शुक्रवारी मध्यरात्री संशयित अनिकेत व्हनकडे याने लोखंडी रॉडच्या सहायाने एटीएम मशीन फोडून त्यातील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. किचकठ प्रक्रिया असल्याने त्याला हे फोडता आले नाही. त्याचा हा प्रयत्न असफल होऊन पैशाऐवजी स्क्रीन बाहेर आले. यावेळी एटीएम मशीन फुटले असते, तर मशीनमधील13 लाख रुपये संशयित व्हनकडे याच्या हाती लागले असते.


पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासात संशयिताचा छडा लावला. हनुमाननगर परिसरातील राहत्या घरातून व्हनकडेला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरलेली एक लहान लोखंडी पहारही त्याच्याकडून जप्त करण्यात आली.


सहायक निरीक्षक अविनाश पाटील यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन- पथके संशयिताच्या शोधासाठी रवाना केली. पोलिसांनी अवघ्या चार तासातच संशयित अनिकेत व्हनकडे यास लोखंडी रॉडसह जेरबंद केले.


इतर महत्वाच्या बातम्या