सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. सांगलीतील इस्लामपूर इथल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट रद्द केलं. शिराळा न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर त्यांच्या गैरहजेरीत अटक वॉरंट रद्द करुन त्यांना जामीन मंजूर करावा असा अर्ज इस्लामपूर इथल्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आज सुनावणी पूर्ण झाली. कनिष्ठ न्यायालय ज्यावेळी निर्देश देईल त्यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावं, असं कोर्टाने सुनावणीच्या वेळी म्हटलं.
राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत आणि शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसंच 28 जानेवारी, 25 जानेवारी, 11 फेब्रुवारी आणि 28 एप्रिल 2022 या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर 2008 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. म्हणून त्यांना रत्नागिरी इथे अटक करुन कल्याण न्यायालयात नेण्यात आलं होतं . त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करुन अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी शिराळा मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारुन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंत आणि जणांवर गुन्हे दाखल झाले होते. जानेवारी 2022 रोजी न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांनाच या दोघांना अटक का केली नाही, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. यासाठी राज ठाकरे यांना 8 जून 2022 रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र शिरीष पारकर न्यायालयात उपस्थित राहिले होते.