सांगली : दुष्काळ, अतिवृष्टीच्या निधीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Sangli District Central Co-operative Bank) कर्मचाऱ्यांनीच सहा ते सात कोटींवर डल्ला मारल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. स्वतंत्र भारत पक्षाकडून याबाबत ज्या शाखेत हा प्रकार झाला त्याची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे. या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 220 शाखा आहेत. उलाढाल 13 हजार कोटी रुपयांची असून, ठेवी सात हजार 905 कोटी रुपयांच्या आहेत. हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या बँकेत ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा बँकच शेतकऱ्यांना आधार आहे; पण काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील कोट्यवधी रुपयांवर कर्मचारीच डल्ला मारत आहेत. 


तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये 10 कर्मचाऱ्यांकडून घोटाळा?


दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाकडून आली आहे. काही शेतकरी मयत तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे खाती नसल्यामुळे ते पैसे घेण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बँकेच्या अनामत खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या निधीची फारशी चौकशी होत नसल्यामुळे चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये 10 कर्मचाऱ्यांनीच जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची शक्यता आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, कडेगाव, पलूस बँकांच्या शाखांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अनामत रकर्मावर डल्ला मारला असण्याची शक्यता आहे. 


जिल्हा बँकेच्या नेलकरंजी (ता. आटपाडी), बसरगी (ता. जत) शाखा आणि तासगाव तालुक्यातील मार्केट यार्ड शाखेसह निमणी, हातनूर आणि सिध्देवाडी शाखेत अपहार झाल्याचे उघडकीस आले. सहा शाखांमध्ये दोन कोटी 43 लाख रुपयांचा अपहार झाला असून त्यातील 93 लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित एक कोटी 53 लाख रुपये वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. 


अनेक वर्षांपासून निधीवर डल्ला


दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. पीक विम्याची मदतही शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांच्या मदतीची सर्व रक्कम जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत खात्यावर ठेवली जाते; पण मदतीची रक्कम शेतकऱ्याऱ्यांच्या खात्यावर न जाता बँकेतील कर्मचाऱ्याऱ्यांनीच त्या रकमेवर टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. 


गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संचालकांकडून संरक्षण?


सांगली जिल्हा बँकेच्या काही शाखेत काही कर्मचायांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे. या अपहाराच्या रकमेवर डल्ला मारलेले कर्मचारी बँकेच्या संचालकांचे चेले आहेत. या चेल्यांच्या इशाऱ्यावरच जिल्हा बँकेच्या शाखांमधील कारभार चालू आहे. एखादा शाखा अधिकारी अपहाराबद्दल कर्मचाऱ्याास नडला तर त्याची लगेच उचलबांगडी केली जात आहे. या भीतीमुळेच बँकेच्या गैरव्यवहाराकडे शाखा अधिकाऱ्याऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.


घोटाळेबाज कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी


जिल्हा बँकेच्या कोणत्याही शाखेतील कर्मचाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर, त्याच्यावर प्रथम गुन्हा दाखल केला पाहिजे, संचालकांचा हस्तक्षेप डावलून प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या