Sangli Crime : मोबाईल, घायल अशा नावाच्या आरोपींकडून 50 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत आरोपींकडून 15 लाख 45 हजार किमतीचा माल जप्त करण्याची कामगिरी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. 


आरोपीकडून साडे बारा लाख किंमतीचे 250 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख किंमतीचे दीड किलो वजनाचे चांदीचे दागिने आणि गुन्ह्यातील चोरीस गेलेली 95 हजारांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेल्या 15 हजारांच्या दोन मोटारसायकल 15 लाख 45 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 


जलस्वराज प्रकल्प कारंदवाडी या ठिकाणी छापा मारुन  मोबाईल भैरु पवार (वय 19 रा. करंजवडे, ता. वाळवा जि. सांगली) घायल संरपच्या काळे (वय 46, रा. चिकुर्डे, ता. वाळवा जि. सांगली) यांना ताब्यात घेतले. तसेच खोत पोल्ट्री फार्म डोंगरवाडी या ठिकाणी छापा मारुन  इक्बाल भैरु पवार (वय 40 रा. करंजवडे ता. वाळवा) प्रविण राजा शिंदे (वय 31, रा. गणेशवाडी वडूज, ता. खटाव, जि. सातारा) यांना वेगवेगळया ठिकाणाहून ताब्यात घेतले.


बंद घरे फोडून ऐवज लांबवणाऱ्या चौघांच्या टोळीस सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीकडून जिल्हाभरातील तब्बल 50 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, 15 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.


जिल्ह्यातील उघडकीस न आलेल्या घरफोडी व अन्य चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एलसीबीने पथकं तयार केले आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार कारंदवाडीतील जलस्वराज्य प्रकल्पावर छापा मारून दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, भगवान पालवे यांचे पथक तयार करुन हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत प्रयत्न करण्यात आले.


या पथकाने सांगली जिल्ह्यातील न उघडकीस आलेल्या घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत करून गुप्त बातमीदारमार्फत माहिती घेतली असता सपोनि प्रशांत निशानदार, चेतन महाजन, संदीप नलवडे, विनायक सुतार, यांना माहीती मिळाली की, घरफोडी व चोरीचे गुन्हे हे सांगली जिल्हा अभिलेखावरील आरोपी नामे मोबाईल पवार, घायल काळे , इकबाल पवार , प्रविण शिंदे यांनी केले असल्याचे माहिती मिळाली.


मिळालेल्या माहितीप्रमाणे सपोनि प्रशांत निशानदार यांनी त्या आरोपींची संपूर्ण माहिती प्राप्त करून सहा पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार , याचे पथकाने जलस्वराज प्रकल्प कारंदवाडी या ठिकाणी छापा मारुन आरोपींना ताब्यात घेतले.