CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगली (Sangli) जिल्ह्यालाही अतविृष्टीचा फटका बसला आहे. या दोन्ही जिलह्यत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे आज पूरस्थिती निर्माण अशा ठिकाणी भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत.


नुकसानग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच दौरा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळं कोल्हापूर आणि सांगलीत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा ठिकाणी भेट देऊन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, सांगलीतल्या खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचं काही दिवसापूर्वी निधन झाले होते. मुख्यमंत्री अनिल बाबर यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी देखील भेट देणार आहेत. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. त्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच पूर पाहणी दौरा आहे. 


आज (13 ऑगस्ट) सकाळी साडेअकरा वाजता मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळाहून वाहनाने सांगलीकडे प्रस्थान करणार आहेत. दुपारी एक वाजता ते आमदार अनिल बाबर यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारी दीड वाजता ते पुन्हा विटा येथून कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहेत. 


कोल्हापूर पाऊस


गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरामध्ये पावसाने विश्रांती घेतली असली, तरी गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यांमध्ये पाऊस सुरुच आहे. शाहूवाडी तालुक्यामध्ये भूस्खलनची घटना झाल्यानंतर आता भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळून रस्ता पूर्ण बंद झाला आहे. त्यामुळे गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे.  धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे आज दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. राधानगरी धरणाचे सध्या 3 दरवाजे (5,6,7) उघडे आहेत. यामधून 4 हजार 284 क्युसेक विसर्ग पाण्यातून होत आहे. पंचगंगेच्या पाणी पातळीत राजाराम बंधाऱ्यावर स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर दोन दिवसांपासून ओसरल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असली, तरी धोका पातळीला पोहोचलेली नाही. दुपारी 3 वाजता पंचगंगेची पातळी 41 फुट 7 इंचावर स्थिर आहे. आज दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील अजूनही 76 बंधारे पाण्याखाली आहेत. 


सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ


सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागातील नागरिकांना स्पीकरवरून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. शिवाय कोयना धरणातून विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे सांगली येथील आयर्विन नदीच्या पाण्याची पातळी 30 फुटांवर गेली आहे. महापालिका प्रशासनाकडून खबरदारी आणि स्थलांतराबाबत जागृती सुरू करण्यात आली आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना मनपा प्रशासनाकडून स्पीकरवरून दिल्या जात आहेत.