भगवानराव पाटील यांनी आपल्या 18 एकर शेतीत द्राक्षांची लागवड केली. मात्र योग्य काळजी घेत त्यांनी या संकटातून बागेला वाचवलं. चोख नियोजन करत केवळ दीड एकरातील द्राक्षांमधून 42 टन उत्पादन मिळवलंय.
प्राथमिक शिक्षक ते प्रगतशील शेतकरी
दीड एकरातील लागवडीतून द्राक्षांचं 42 टन उत्पादन मिळवणारे भगवानराव पाटील. सांगलीतील येळावी त्यांचं गाव. भगवानराव पाटील याआधी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करायचे. 1981 मध्ये त्यांनी 1 एकरावर द्राक्षांची लागवड केली. हळूहळू उत्पन्न आणि लागवड क्षेत्रातही वाढ केली. आज 18 एकरावर ते द्राक्ष शेती करतात. यात 8 एकरावर 6 वर्षांची सोनाका, 3 एकरावर 8 वर्षाची माणिकचमन, साडे 5 एकरावर 4 वर्षाची माणिकचमन आणि दीड एकरात दोन वर्षाची सूपर सोनाका या द्राक्षांची लागवड केली. दीड एकरातील सूपर सोनाकाची सध्या काढणी सुरु आहे.
जानेवारी 2016 मध्ये 8 बाय 4 फूट अंतरावर सूपर सोनाकाची लागवड केली. दीड एकरात जवळपास 2100 रोपं बसली. सप्टेंबरमध्ये द्राक्षांचे डोळे भरले. जानेवारीमध्ये रिकटींग करण्यात आलं. यावेळी भगवानराव पाटील यांनी द्राक्षामध्ये मका, सोयाबीन, हरभरा यांसारखी आंकरपिकं घेतली. बागेच्या व्यवस्थापनात भगवानरावांनी सेंद्रिय खतांच्या वापरावर भर दिलाय.
सूपर सोनाकाच्या २१०० रोपांतून ४२ टन उत्पादन त्यांना मिळणार आहे. प्रति किलो ५० रुपयांचा दर त्यांना सध्या मिळतोय. त्यानुसार दीड एकरातून २१ लाखांचं उत्पन्न त्यांना मिळणार आहे.
भगवानरावांना दीड एकरातील बागेच्या व्यवस्थापनासाठी १० लाखांपर्यंतचा खर्च आलाय. तो वजा जाता २० लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे.
भगवानराव गेली २७ वर्ष द्राक्षांचं पीक घेतायत. दूरच्या गावाहून शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देतात. आपल्या अनुभवातून भगवानराव शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात.
सूपर सोनाकासाठी झालेला खर्च भगवानरावांनी पहिल्याच तोड्यात काढला. द्राक्ष शेतीमधल्या अनुभवामुळे बागेचं वेळच्या वेळी आणि योग्य नियोजन त्यांना करता आलं. यंदा द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संकटं आली. मात्र अशा वेळीही त्यांनी तज्ञांचं मार्गदर्शन घेत बागेचं व्यवस्थापन केलं. भगवानराव पाटील यांनी केलेल्या या चोख व्यवस्थापनामुळेच त्यांना भरघोस उत्पादन मिळवता आलं.
VIDEO: