केवळ आणि केवळ बिर्याणीच विकणारी अख्ख्या मुंबईत किमान १२५ ते १३० रेस्टॉरन्टस आहेत. पण त्यातही एक गंमत आहे, या साधारण दीडेकशे रेस्टॉरन्टसपैकी बहुतांश केवळ होम डिलीवरी देतात,
घरी एखादी पार्टी असली आणि मेन्यू ठरवायचा म्हंटलं की आजकाल दहा बारा पदार्थांपेक्षा मोजकेच पण चवदार पदार्थ असतील असा मेन्यू ठरवण्याकडे कल असतो सगळ्यांचाच..किंवा भरपूर स्टार्टर्सच्या जोडीला ज्याला ‘वन डिश मिल’ म्हणता येईल असा काहीतरी पदार्थ निवडण्याकडेही पार्टीच्या आयोजकांचा कल असतो आणि असा ‘वन डिश मिल’ या संकल्पनेला साजेसा पोटभर होईल पण तितकाच चवदारही ठरेल असा पदार्थ निवडताना चटकन पर्याय सुचतो तो कुठल्यातरी प्रकारच्या भाताचा. मग भाताच्या प्रकारातही चविष्ट बिर्याणीचा पर्याय बरेचदा पहिल्या पसंतीचा ठरतो. व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो पार्ट्यांमध्ये कायम दिसणारा हा पदार्थ तसं पाहिलं तर घरी करायला चांगलाच किचकट आहे, म्हणूनच की काय जवळपास सगळ्याच शहरांमध्ये व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणी असे बिर्याणीचे दोन पर्याय किलोप्रमाणे देणारी कितीतरी ठिकाणं दिसतात. अगदी रस्त्याच्या कडेला छोट्याशा जागेत केवळ बिर्याणीच विकणाऱ्य़ा एखाद्या आचाऱ्याचं छोटंसं दुकान असो किंवा विविध प्रकारची बिर्याणी विकणारे मोठमोठे ब्राण्डस असोत, या सगळ्या बिर्याणी व्यवसायावरुन लक्षात येतं की सध्य़ा बिर्याणीचा खप जोरदार होतोय.. बोरिवली बिर्याणी सेंटर किंवा बीबीसी हा तर मुंबईत कित्येक वर्षांपासून लोकप्रिय असलेला ब्रॅण्ड आहे. केवळ आणि केवळ बिर्याणीच विकणारी अख्ख्या मुंबईत किमान १२५ ते १३० रेस्टॉरन्टस आहेत. पण त्यातही एक गंमत आहे, या साधारण दीडेकशे रेस्टॉरन्टसपैकी बहुतांश केवळ होम डिलीवरी देतात, त्यांच्याकडे बसून खाण्याची कुठलीही सोय नाही.. अर्थात छोटेमोठे कार्यसमारंभ, पार्ट्या अशांसाठी बिर्याणी हा सर्वात आवडता पर्याय असल्याने एक किलो, दोन किलो किंवा त्याहूनही अधिक बिर्याणीही विकत मिळत असल्यानं या बिर्याणी आऊटलेट्सचा घरपोच सेवा देण्याकडे कल असतो. पण ही होम डिलीवरीची, त्याच्या पॅकींगची पद्धतही मोठी आकर्षक असते आणि म्हणूनच बिर्याणी विकणारी आऊटलेट्स सध्या खवय्यांच्या चांगलीच पसंतीस उतरु लागलीत. मुंबईत अशी केवळ बिर्याणी विकणारी, बिर्याणीची होम डिलीवरी करणारी अनेक आऊटलेट्स आहेत आणि त्यातले काही ब्रॅण्डस तर प्रचंड लोकप्रिय आहेत.. बोरिवली बिर्याणी सेंटर (BBC), बिर्याणी हाऊस, अम्मीज बिर्याणी अशी अनेक नावं आहेत ज्यांची आऊटलेट्स अगदी मुंबईच्या कानाकोपऱ्यात दिसतात. पण त्यांच्याच कडीतलं आणखी एक आणि सध्या अतिशय लोकप्रिय झालेलं नाव म्हणजे ‘बेहरोज बिर्याणी’..हे नाव सध्या बिर्याणीच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होऊ लागलंय. खरं तर भारताच्या उत्तरेकडला आणि हैद्राबादसारखा दक्षिण भागातला पारंपरिक पदार्थ म्हणजे बिर्याणी..बिर्याणी शिजवण्याची जागोजागची सिक्रेट रेसिपीसुद्धा परंपरेनी पुढच्या पुढच्या पिढीला मिळते..त्यामुळेच तर भारतीय पाककलेच्या वैभवशाली परंपरेत बिर्याणी या पदार्थाचा अगदी वरचा क्रमांक लागतो..या पारंपरिक पदार्थाला या डिजीटल किंवा मॉडर्न टच देण्याचं काम ही मॉडर्न बिर्याणी आऊटलेट्स करतात असं म्हणावं लागेल. बेहरुझच्या वेबसाईटवरुन आपल्याला त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कुठल्याही प्रकारची बिर्याणी, जितकी हवी तितक्या प्रमाणात मागवू शकतो..बेहरोजच्या मेन्यूकार्डातही आपल्याला मॉडर्न आणि पारंपरिक बिर्याणीच्या प्रकारांचं मस्त कॉम्बिनेशन बघायला मिळतं..म्हणजे सब्ज ए बिर्याणी, पनीर ए खास बिर्याणी, पनीर सब्ज बिर्याणी अशा पारंपरिक बिर्याणीच्या स्वादाबरोबरच फलाफल बिर्याणी नावाचा मॉडर्न प्रकारही मिळतो..पूर्णपणे भारतीय चवींच्या बिर्याणीमध्ये ‘फलाफल’ नावाचे लेबनिज वडे टाकून केलेली सुगंधी बिर्याणीही पारंपरिक प्रकाराइतकीच चवदार लागते, हे वेगळं सांगायलाच नको..तशीच चवींची व्हेरायटी मिळते मांसाहारी बिर्याणीच्या मेन्यूमध्ये. शाही गोश्त बिर्याणी, खिमा गोश्त बिर्याणी, मुर्ग माखनी बिर्याणी, लझीझ भुना बिर्याणी असे कितीतरी प्रकार खवय्यांच्या आवडीनुसार या बेहरोझच्या वेबसाईटवर आपल्यासाठी उपलब्ध असतात. या बिर्याणीबरोबर दिल्या जाणाऱ्या साईड डिशेसही तितक्याच चवदार आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या असतात..म्हणजे शाकाहारी बिर्याणीचा पर्याय स्विकारल्यास त्याच्याबरोबर छोटे छोटे फलाफल आणि चिज अशा साईड डिशचा पर्याय विचारला जातो. तर नॉनव्हेज बिर्याणीच्या जोडीला चिकन किंवा मुर्ग कोफ्त्याचा एकदम टेस्टी पर्याय निवडता येतो..तसंच या बेहरोज बिर्याणीसोबत मिळणारं एकमेव डेझर्ट म्हणजे त्यांचे मऊ आणि लुसलुशीत गुलाबजाम..वेबसाईटही इतकी सोपी आणि लोकांसाठी चांगली आहे की आपण ऑर्डर देतांना एखाद्या व्यक्तीशीच बोलतोय की काय असं वाटावं. हव्या त्या बिर्याणीच्या प्रकारावर क्लिक केलं की किती व्यक्ती ते खाणार तो आकडा आपण टाकायचा आणि त्यानुसार बिर्याणी किती घ्यावी लागणार हे देखील ते वेबसाईटच सांगतं. त्या वेबसाईटवरच्या सर्व सुचनांनुसार ऑर्डर दिल्यावर अगदी अर्धा तासात जवळच्या त्यांच्या आऊटलेटमधून पार्सल तुमच्या घरी पोहोचतं, ते पार्सलही अतिशय आकर्षक असतं. चौकोनी कागदी खोक्यांमध्ये बिर्याणी पसरवून भरलेली असते. उघडल्याबरोबर सर्वात वरती दिसतो तो बदामासारख्या ड्रायफ्रुट्सचा थर, त्यानंतर पांढऱ्या भाताचा थर आणि चमचा आत घातला की बिर्याणीचे इतर थरही दिसतात, पार्सल उघडल्याबरोबरच दिसायला आकर्षक अशी बिर्याणी आपल्यासमोर असते. चवीच्या बाबतीतही बेहरोजची बिर्याणी उजवी ठरते, खरं तर झणझणीत चवी नसतात बेहरोजच्या बिर्याणीच्या, पण कमी तिखट असली तरी इथली बिर्याणी चवदार मात्र असते. तसंच सोबत दिली जाणारी दह्याची चटणी, साईड डिशेश यांनी त्या बिर्याणीची चव अधिकच खुलते.. त्यामुळे घरबसल्या थेट रेस्टॉरन्टच्या चवीच्या बिर्याणीचा आस्वाद घ्यायचा असेल आणि आलेल्या पाहुण्यानाही ती मेजवानी द्यायची असेल तर इतर बिर्याणी हाऊसेस सोबतच सध्याचा लाडका बेहरोज बिर्याणीचा पर्याय नक्कीच चांगला ठरतो..