Punjab Assembly Election 2022: सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनानंतर संयुक्त समाज मोर्चाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर संयुक्त समाज मोर्चाने निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील केली होती. त्यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली होती. मात्र, राजकीय पक्ष म्हणून संयुक्त समाज मोर्चाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली नाही. त्यामुळे संयुक्त समाज मोर्चाचे उमेदवार आता अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.  


निवडणूक आयोगाकडे संयुक्त समाज मोर्चाची नोंदणी न झाल्यामुळे त्यांच्या उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. संयुक्त समाज मोर्चाची नोंदणा होऊ न शकल्यामुळे निवडणूक आयोगाने संयुक्त समाज मोर्चाला कोणतेही चिन्ह दिले नाही.  गुरनाम सिंह चढूनी यांच्याबरोबर संयुक्त समाज मोर्चा निवडणूक लढवत आहे. बलबीर सिंह राजेवाल यांच्या नेतृत्वात संयुक्त समाज मोर्चाने 102 उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील केली आहे. त्यानंतर राजेवाल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली होती.
 
संयुक्त समाज मोर्चाने डिसेंबरमध्ये पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या पंजाबच्या 32 पैकी 22 शेतकरी संघटनांनी बलबीर राजेवाल यांना निवडणूक लढवण्यासाठी आपला नेता मानले होते. मात्र, यापैकी 9 संघटनांनी नंतर निवडणूक लढविण्याच्या निर्णयापासून माघार घेतली होती. पंजाब विधानसभेच्या 117 जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची पडताळणी होणार असून, 4  फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत.


सध्या पंजाबमधील निवडणूक प्रचार रंगात आली आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय समीकरणेही बदलत आहेत. प्रत्येक पक्ष प्रचारामध्ये व्यस्त आहे. सत्ताधारी काँग्रेसनेही जोरदार प्रचार सुरु केला आहे. अशातच पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असल्याच्या बातम्याही समोर येत आहे. पंजाब काँग्रेस वारंवार पक्षामध्ये सर्वकाही ठीक असल्याचे स्पष्टीकरण देत आहे, पण पडद्याच्या मागील घडामोडी वेगाने घडत आहे. मुख्यमंत्री पदावरुन पक्षात फूट पडल्याचे बोललं जात आहे.  


महत्त्वाच्या बातम्या: