औरंगाबाद : महाविकासआघाडीनं लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तर 2024 साली शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, असा विश्वास शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. महाविकासआघाडी अशीच एकत्र राहिली तर मराठी माणसाला पंतप्रधानपदी बसवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं असंही ते म्हणाले. औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. जनतेचा नेत्यावर विश्वास राहिला नाही तर वेळप्रसंगी व्यक्तीला बूटही हातात घ्यावे लागतात असा टोला रोहित पवारांनी लगावला.


यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. लोकसभेत एकत्र येऊन लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी बघितलेले स्वप्न पूर्ण होऊ शकतं, असं ते म्हणाले. शरद पवार यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. पवारसाहेब  जेव्हा कुठेही जातात तेव्हा सामान्य लोकांना काय पाहिजे ते ओळखून घेत असतात. साहेबांचा लोकांवर विश्वास आहे. लोकांचा साहेबांवर विश्वास आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

एखाद्या नेत्याचा लोकांवर विश्वास नसला की तर त्या नेत्याला बूट हातात घ्यावा लागतो, अशी टीका रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर  केली. भाजप नेत्यांनी सरकार फोडण्याचे कितीही प्रयत्न केले तरी यश मिळणार नाही, त्यांना आशेवर राहू द्या, असंही ते म्हणाले. भाजप नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की किती प्रयत्न केले तरीही यश मिळणार नाही. त्यांनी आशेवर राहू नये. सुधीर मुनगंटीवार यांनी अशी आशा अनेकदा व्यक्त केली. मात्र त्यांना यश मिळणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले.