अमरावती : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मागच्या सरकारच्या कारभारावर आणि योजनांवर सडकून टीका केली आहे. मागील पाच वर्षात भाजप सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार या योजनांवर काम केलं. मात्र या सर्व योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्याच नाहीत. भाजपने काम कमी केलं आणि कामांंचं मार्केटिंगच जास्त केलं, अशी टीका रोहित पवार यांनी केली. अमरावती येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.
भाजपकडून ज्या पद्धतीने या योजना राबवल्या गेल्या पाहिजे होत्या, तशी त्यांची अंमलबजावणी झाली नाही. मागेल त्याला शेततळे 50 हजार रुपयात दिलं गेलं. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. तेवढ्या पैशात काहींची शेततळी तयारही झाली नाहीत. शेततळं तयार करण्यासाठी पाणी टाकायला अस्थरीकरण (प्लास्टिक कागद) लागतं. फक्त आकडे वाढवण्यासाठी शेततळी देण्यात आली. अनेकांना अस्थरीकरण मिळालंही नाही. पण त्या शेततळ्यात पाणी टाकल्यावर त्यामध्ये पाणी राहत नव्हतं, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
जलयुक्त शिवारावर 6-7 हजार कोटींवर खर्च मागील सरकारने केला. मात्र या योजनांमध्ये केलेलं कामाची आजची स्थिती वाईट आहे. त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. या योजनांमागे विचार चांगला होता, मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये असताना एक योजना (इंटिग्रेटेट वॉटर शेड) होती, ती बदलून भाजप सरकारने नवी योजना सुरु केली. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य झाली नाही म्हणून लोकांना त्याचा फायदा झाला नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं.
सरकारने सुरु केलेल्या स्कील इंडिया योजनेचे सेंटर आज बंद दिसतील. तरुणांसाठी नवीन व्यवसायासाठी कर्ज देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, मात्र कुणालाही ते मिळालं नाही. गेल्या सरकारमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचं प्रमाण कमी झालं. भाजप सरकारने कामाच्या मार्केटिंगवर जास्त लक्ष दिलं नाही. मात्र कामांबद्दल प्रश्न विचारला की वेगळी उत्तर देऊन लोकांची दिशाभूल केली. पाच वर्षात देखावा जास्त केला. मात्र आता या योजना लोकांना विश्वासात घेऊन लोकांपर्यंत कशा पोहचतील यावर आमचं सरकार भर देईल, असं रोहित पवारांनी सांगितलं.