Sant Muktai Palkhi : 'निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, ज्ञानोबा माउली तुकाराम,  'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.... श्री ज्ञानदेव तुकाराम.... आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात चार दिवसांपासून संत मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरपूर (Pandharpur) कडे कूच करत आहे. आज ही पालखी बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana) असून आजचा मुक्काम चिखली शहरात असणार आहे. 


संत मुक्ताबाई (Sant Muktabai Palkhi) आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा हा मानाचा समजला जाणारा हा पालखी सोहळा आहे. तब्बल 600 किमीचा पायी प्रवास असून 25 दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते. सर्वात लांब पल्ल्याची मुक्ताबाईंची दिंडी असून शुक्रवारी श्रीक्षेत्र कोथळी पंढरपूरकडे प्रस्थान केले. वारकरी (warkari) भाविक आणि शहरवासीयांनी रखरखत्या उन्हातही संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याला हजेरी लावली. पालखीचा पहिला मुक्काम नवे मुक्ताई मंदिर येथे झाला. त्यानंतर चार दिवसांपासून मुक्ताई पालखीचा पायी प्रवास सुरु असून आज सकाळी बुलढाणा येथून निघाल्यानंतर दुपारी हातनी येथे जेवण केले. त्यानंतर आजचा मुक्काम चिखली येथे असणार आहे. 


तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर असलेली मुक्ताईची पालखी.  दिवसाला पंचवीस ते तीस किलोमीटरवर ते अंतर कापत पंढरपूर गाठत आहेत. तर मुक्कामानंतर सकाळपासून मुक्ताई पालखीत नव्या वारकरी भाविकांची भर पडत आहेत. परिसरातील अनेक भाविक पंढरपूर विठुरायाच्या दर्शनासाठी दिंडीत सहभागी होत आहेत. त्यामुळे पालखी निघाल्यापासून भाविकांची मांदियाळी जमलेली आहे. टाळमृदंगांच्या गजराने मंदिर परिसर दणाणला जात आहे. वारी दिंडीत मुक्ताईंचा जयघोष सुरू असून, संत दर्शन आणि पांडुरंग परमात्मा दर्शनाची ओढ असलेले वारकरी ध्वज पताका आणि भालदार, चोपदार यांच्यासह मुक्ताई पालखी हळूहळू पुढे सरकत आहे.


वारीत महिलांचा सहभाग मोठा


पंढरीच्या वारीसाठी भगिनींचा सहभागही मोठा होता. विठूरायाच्या भेटीसाठी वारकऱ्याचे एकेक पाऊल पुढे पडत होते. दिंडी, भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, टाळांचा लयबद्ध आवाज, अभंगाला वारकऱ्यांची साद हा भक्तिरसाचा सोहळा जसजसे पुढे सरकत होता, तसा आध्यात्मिक आनंद देत होता. मुक्ताईनगर शहरातून पुढे ठिकठिकाणी रस्त्यावर, गावागावात पालखीची शोभायात्रा मार्गस्थ होताना स्वागत करण्यात येत आहे. आज सायंकाळी पालखी सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे विसावणार आहे. त्यानुसार चिखली ग्रामस्थांकडून सायंकाळी पालखीचे विधिवत पूजन होऊन मुक्ताई आरती पार पडेल.