रत्नागिरी: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत यांच्या (Kiran Samant ) वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. किरण सामंत यांनी आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पर्याय नसल्यास मी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं किरण सामंत यांनी म्हटलं आहे. किरण सामंत यांच्या लोकसभेतील उमेदवारीबाबत कायमच चर्चा असते. किरण सामंत यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवण्यासंजर्भात वक्तव्य केले आहे
किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्यासाठी किरण सामंत यांची इच्छा आहे. शिवाय ते आगामी उमेदवार असू शकतात अशी चर्चा कोकणात गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची व्यक्त केलेले इच्छा ही महत्त्वाची मानली जाते.यापूर्वी त्यांनी मशालीचे चिन्ह आपल्या व्हॉट्सअॅप डीपीला देखील ठेवले होते.
आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकणाचा दोन दिवसीय दौरा संपन्न झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. राजापूर - लांजा - साखरपा या विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांचे निकटवर्तीय, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश प्रवेश केला आहे.त्यामुळे राजन साळवी यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेला हा एक धक्का मानला जात आहे.उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैया सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण
रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवार कोण? याची चर्चा सुरू असताना उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान लांजा येथे कार्यकर्ता मेळाव्यामध्ये उदय सामंत यांनी किरण सामंत यांच्या नावालाच दुजोरा दिला होता. उदय सामंत यांच्या विधानानंतर रंगली होती. "माझे शासकीय निवासस्थान मुंबईत आहे. पण आपले शासकीय निवासस्थान दिल्लीत असले पाहिजे'' असं म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आपले मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत लोकसभा उमेदवारीबाबत प्रकारे सुतोवाच केले होते.
किंगमेकर अशी ओळख
किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना किंगमेकर म्हणून रत्नागिरीमध्ये ओळखलं जातं. लोकांची विविध कामं हाताळताना किरण सामंत दिसून येतात. बांधकाम व्यवसायामध्ये असलेले किरण सामंत यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. उच्च शिक्षित असलेले किरण सामंत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल देखील मिळवलेले आहे. सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. पडद्यामागे असलेले किरण सामंत उदय सामंत यांच्यापाठी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते.