GudiPadawa 2024: गुढीपाडवा हा मराठी नवं वर्षातला अत्यंत महत्वाचा आणि मोठा सण आहे, या दिवशी मराठी नववर्षाला सुरवात होते. राज्यभरात या सणाच्या निमित्ताने शोभा यात्रा आणि गोड जेवण करून उत्साहात साजरा केला जातो. पण कोकणातील चिपळूण तालुक्यातल्या गोवळकोटमधील भोई समाजाकडून केला जाणारा रांगमाली उत्सव हा विशेष आगळा वेगळा आहे. अर्थात त्यामागचे कारणही तसेच आहे. काय आहेत या रांगमाली उत्सवाची वैशिष्ट्य जाणून घ्या.
कोकणात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गोवळकोट नदीकिनारी राहणारे भोई समाजात गुढीपाडव्यानिमित्त नदीला दारूची धार सोडण्याची प्रथा आहे. वाचून धक्का बसला ना ?? होय, इथे नदीला चक्क दारू सोडली जाते. गोवळकोट मधील भोई समाज हा नदीतील मासेमारीवर अवलंबून असणारा समाज त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त म्हणजेच मराठी नवीन वर्षानिमित्त ज्या नदीमधून मासेमारी केली जाते. त्या नदीला चक्क दारूची धार सोडण्याची पारंपरिक प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जवळजवळ 100 ते 150 मंडळी वाशिष्टी नदीच्या एका बेटावर जातात. या ठिकाणी नदीला दारूची धार वाहिली जाते देवाला आर्जव घातला जातो आणि मग चहापानाचा कार्यक्रम होतो.तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी गो रंग माली अशा प्रकारची गाणी म्हणत ही मंडळी नदीमधून होडीने बेटावर जातात. थोडासा आगळावेगळा वाटला तरी श्रध्देने परंपरा चालवणारा हा कार्यक्रम नक्कीच लक्षवेधी आहे.
गुढीपाडवा हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो, त्यामुळे या सणाचं महत्त्व अधिक आहे. हिदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण साजरा केला जातो. हा सण हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी लोक सोन्याच्या खरेदीला किंवा नवीन वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याला विशेष महत्त्वं आहे. उंच बांबूच्या काठीवर ही गुढी उभारली जाते. सहसा ती घराच्या छतापासून वर असेल अशीच बांधली जाते. अर्थात शहरी भागात हे अनेकदा शक्य नसल्यामुळे गुढीच्या उंचीपेक्षा ती उभारण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं.
गुढीपाडव्याला काय करावं?
गुढीपाडव्याच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी पहाटे उठून अंघोळ करावी. घरात झाडलोट करावी, केरकचरा काढावा. सकाळी दरवाजाबाहेर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. घरातील देव स्वच्छ करुन देवांची मनोभावे पूजा करावी आणि गुढी उभारायला घ्यावी.