मुंबई: राज्यात ज्या ज्या समाजाने आंदोलनं केली त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी भेट दिली, मग मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना ते का भेटायला गेले नाहीत असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने नेते भास्कर जाधव यांनी केला. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद भडकावा अशी कुणाची इच्छा आहे? या सर्वामागे कुणाचं डोकं आहे हे सर्वांनाच माहिती असल्याचं ते म्हणाले. 


भास्कर जाधव म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी (Maratha Reservation Protest) ही अनेक वर्षापासूनची आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी कुठल्याही प्रकारची विद्ध्वंसक कारवाई किंवा कुठलाही विद्ध्वंसक विचार हा त्यानी कधीही मनामध्ये आणला नाही. पण उपोषण सुरु असताना सरकारने काहीही कारणाशिवाय लाठी चार्ज केला.


आरक्षणाची खात्री नव्हती तर शपथ का घेतली? (Bhaskar Jadhav On CM Eknath Shinde)


राज्य सरकारवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले की, मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसांची मुदत देऊनही काहीही झाले नाही. हा सरकारचा दुबळेपणा आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांची भूमिका रास्त आहे. सरकारने आपला अहंकार, हट्टपणा सोडला पाहिजे. शिंदेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली. शिंदेंना आरक्षणाबाबत जर खात्री नव्हती तर त्यांनी अशी शपथ का घेतली? 2014 साली राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सरकारने जे आरक्षण दिले होते ते कुणामुळे गेलं याचा विचार केला पाहिजे?


ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद भडकावा अशी इच्छा कुणाची आहे? या मागे कुणाचं डोकं आहे हे समजून घ्यावं. आधी ज्या ज्या समाजाने उपोषण केलं त्या त्या वेळेस देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जाऊन उपोषणकर्त्यांना भेटले. मग मराठा समाजालाच का भेटत नाहीत? असे सवालही भास्कर जाधव यांनी केले. 


जाळपोळ कोण केलीय हे ठरवण्याची घाई का? 


भास्कर जाधव म्हणाले की, "अशा प्रकारच्या दंगली अशा प्रकारच्या घटना पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडल्या का? त्याच्यापूर्वी अशा अनेक दंगली झालेल्या आहेत. साधारणपणे त्या घटनेची तीव्रता कमी होण्याची वाट बघितली जाते. त्या घटना लोक विसरण्याची वाट बघितली जाते. त्या घटना थोड्याशा थांबण्याची वाट बघितली जाते. आणि मग पोलीस शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. आजही तुम्ही गुन्हे दाखल केलेत, त्या आगी लावणं हा जो प्रकार झाला हा चांगला झालाय का? त्या ठिकाणी जाळपोळ झाली ते चांगलं नाही. पण ती जाळपोळ मराठा समाजाच्या लोकांनी केली हे तुम्ही कशावरून ठरवलं? जरी ठरवलं असाल तर इतक्या लगेच 307 चे गुन्हे दाखल करण्याची घाई का करताय? ती घाई करत असताना त्याला एवढी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी का देताय? याच्या पाठीमागे तुमच्या डोक्यात काय आहे हे महाराष्ट्र ओळखून आहे. परंतु तुमच्या डोक्यात जरी काही असलं तरी महाराष्ट्र हा आपली संस्कृती विसरणार नाही एवढं मला वाटतं."


ही बातमी वाचा: