Kokan Ganpati Festival: गणेशोत्सव आणि कोकणाचं अनोखं नातं आहे. कोकणी लोकांना गणपती येण्याच्या तीन-चार महिने आधीपासूनच बाप्पाचे वेध लागलेले असतात. गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) काळात कोकणात जाणाऱ्या गाड्या फुल्ल असतात, अशातच एसटी (ST Bus) महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी जादा  3,100 एसटी बसेस धावणार आहेत.


14 ते 19 सप्टेंबर दरम्यान धावणार जादा एसटी गाड्या


यंदा गणपती बाप्पांचं 19 सप्टेंबर 2023 रोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज झालं आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान 3,100 जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


गट आरक्षणांतर्गत 1,700 बसेस आरक्षित


एसटी महामंडळाने याआधीच एसटी गट आरक्षण (ST Group Reservation) सुरू केलं होतं. त्याप्रमाणे आतापर्यंत 1,700 एसटी गाड्यांचं आरक्षण पुर्ण झालं आहे. गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना (75 वर्षांवरील वयोगटातील) तिकिट दरात 100 टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना तिकिट दरात 50 टक्के सवलत दिली जात आहे. 14 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.


कोकणचा चाकरमानी, गणपती आणि एसटी


गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटीचं एक अतुट नातं आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेत एसटी धावत असते, यातच यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांना गोड बातमी दिली आहे. यंदा सुमारे 3,100 जादा एसटी गाड्या कोकणातील रस्त्यावर धावणार आहेत.


कसं कराल एसटी बसचं आरक्षण?


एसटी बस आरक्षणासाठी तुम्हाला https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या संकेतस्थळावरुन तुम्हाला उपलब्ध बसची माहिती मिळेल. एसटी बसेसचं आरक्षण तुम्हाला बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या Msrtc Mobile Reservation App ॲपद्वारे करता येणार आहे. त्याचप्रमाणे खासगी बुकींग एजंट देखील तुम्हाला एसटी बस आरक्षित करुन देऊ शकतात.


एसटी महामंडळाकडून प्राथमिक सुविधा


गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर (Bus Stop) एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहं देखील उभारण्यात येणार आहेत.


हेही वाचा:


Nandurbar News: कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने गणेश मूर्ती 30 टक्क्याने महाग होणार, गणेश मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात