रत्नागिरी :  शरद पवार गटाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर (Sudesh Mayekar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या शिवसेनेत (Shiv Sena)  प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar)  गटाला रत्नागिरीमध्ये (Ratnagiri News)  मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. उदय सामंत यांचे निकटवर्तीय आणि बालमित्र अशी मयेकर यांची ओळख. पण 2014 मध्ये उदय सामंत (Uday Samant)  यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर देखील सुदेश मयेकर यांनी शरद पवारांची साथ सोडली नव्हती. दरम्यान उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सामंत यांची आई तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि रत्नागिरीचा विकास करा अशी साद घातली. त्यानंतर आता सुदेश मयेकर उदय सामंत यांच्या आईनं साद घातल्यानंतर  शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 


उद्योग मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांचा 7 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. त्याच दिवशी मयेकर यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सर्व घडामोडी महत्त्वाच्या आहेत.उदय सामंत यांच्या निकटवर्तीय आणि बालमित्र अशी मयेकर यांची ओळख आहे. 


कोण आहेत सुदेश मयेकर?


 उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बालमित्र आणि निकटवर्ती अशी सुदेश मयेकर यांची ओळख. सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मयेकर यांनी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम केले. दरम्यान 2014 मध्ये राजकीय गणित बदलली आणि उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण त्यानंतर देखील मैत्रीपेक्षा त्यांनी पक्षनिष्ठेला प्राधान्य देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणंच पसंत केलं. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांनी आपला वेगळा गट स्थापन केला. पण त्यावेळी देखील सुदेश मयेकर यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. त्यांच्याकडे रत्नागिरीच्या दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. पण अंतर्गत कुरघोडी, राजकारण आणि वरिष्ठ पातळीवर सूचनांकडे केले जात असलेले दुर्लक्ष यामुळे मयेकर नाराज असल्याची चर्चा होती. 


उदय सामंत यांच्या आईने घातली होती साद


हे सारं घडत असताना 26 डिसेंबर रोजी उदय सामंत यांचा वाढदिवस होता. त्यावेळी सुदेश मयेकर उदय सामंत यांच्या पाली या गावातील निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले. त्याचवेळी उदय सामंत यांची आई स्वरूपा सामंत यांनी मयेकर यांना साद घातली. सुदेश तू, उदय आणि किरण बालपणीपासूनचे मित्र आहात. तुम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे रत्नागिरीचा विकास आणखी वेगाने किंवा पुढे न्यायचा असेल तर तुम्ही तिघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यामुळे तू उदयला साथ द्यावीस. उदय सामंत यांच्या आईने टाकलेला हा शब्द सुदेश मयेकर यांना टाळणे अशक्य झालं आणि त्याच भावनेतून सुदेश मयेकर उदय सामंत यांची साथ देणार असल्याची माहिती आता मिळत आहे. सुदेश मयेकर यांनी रत्नागिरीमध्ये नगरसेवक पद देखील भूषवलं आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांच्याकडे शरद पवार गटाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी होती. पण त्यानंतर त्यांनी ते पद देखील सोडले.


हे ही वाचा:


Kiran Samant: किरण सामंत यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी मागितली, कामाला लागा; उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना आदेश