Ratnagiri News :  कोकणात (Kokan) दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे अनेक गावं बाधित झाली होती. गावातील रस्ते, शेती सर्व काही उद्ध्वस्त झाले होते. दोन वर्षानंतर आजही त्या जखमा ताज्या आहेत. सरकारने लक्ष न दिल्याने सध्या प्रशासनही कानाडोळा करत आहे. प्रशासनाच्या या अनास्थेचा फटका गावकऱ्यांना बसत आहे.  


खेड (Khed) तालुक्यातील धरणाच्या शेजारी असलेले शिरगाव. हे गाव सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे गावात जाण्यासठी नागमोडी वळणाचा रस्ता आहे. पण हाच रस्ता दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत खचला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीत पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर दगडगोटे या रस्त्यावर आले. परिणामी नाले, मोऱ्या या पार वाहून गेल्या तर काही ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्या खाली गेल्या आहेत. 


गावात एसटी येत नाही, शाळेसाठी मुलांची पायपीट


रघुवीर घाटातून येणारा हा मार्ग शिरगाव ते गावातील पिंपळवाडी, कोंडवाडी, भोसलेवाडी, अदडसवाडी, धनगरवाडी, बागवाडी या पाच वाड्यांकडे येणारा प्रमुख मार्ग आहे. या मार्गाचीही अवस्था फार बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे दगड आल्याने गावात एसटी बस देखील येत नाही. अडीच हजार लोकसंख्या असलेले हे गाव आहे. गावातील मुलांना शाळेसाठी आपल्या घरापासून जवळपास साडेचार किलोमीटर पायपीट करावी लागते. 


...तर निवडणुकांवर बहिष्कार टाकू, गावकऱ्यांचा इशारा


अतिवृष्टी झाल्यानंतरही प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे आम्ही गेली दोन वर्षे गावातील समस्यांची पत्राद्वारे निवेदनही देत आहे. सरकारी दफ्तरी वारंवार पायपीट करतोय तरीही ते लक्ष देत नाहीत, अशी प्रतिक्रिया गावातील रहिवाशांनी दिली आहे. निवडणुका जवळ आल्या की प्रशासन, सरकार मतदानाचा हक्क बजावा असे म्हणतात. पण मतदान केल्यावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष देत नाही. सरकार कुणाचेही असो त्यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे आमच्या गावातील समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे गावकरी म्हणत आहेत. आमच्या गावच्या समस्येकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या निवडणुकांवर आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा गावकरी देतात. मतदानाचा हक्क बजावणार नाही, असे देखील गावकरी म्हणाले. 


मंजूर झालेला निधी गेला कुठे?


गावात पिंपळवाडी धरण माथ्यावरुन जाणाऱ्या मार्गाचा एक भाग धरणाच्या दिशेने ढासळला आहे. नऊ फूट रुंदीचा रस्ता ढासळत ढासळत त्याची आता फक्त पायवाट उरली आहे. गावात जाण्यासाठी या रस्त्याशिवाय दुसरा मार्ग नसल्यामुळे या ढासळलेल्या रस्त्यावरुनच गावकऱ्यांचा सध्या जीवघेणा प्रवास सुरु आहे. अतिवृष्टीच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार होतं, हे सरकार असताना कोट्यवधी निधी अतिवृष्टीत बाधित झालेल्या गावांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मंजूर झाला. मात्र हा निधी गेली दोन वर्षे मुरला कुठे हेच काही कळत नाही.