Ratnagiri News : चिपळूण (Chiplun) मधील ओमळी गावातील 23 वर्षीय नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूला आठ दिवस पूर्ण होत आले तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील नाभिक समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर निलिमाचा जीव वाचला असता अशी भावना तिच्या भावाने व्यक्त केली आहे. तसेच जे काम पोलिसांनी करायला हवे ते काम आम्ही करत आहोत असा आरोपही निलिमाचे नातेवाईक करत आहेत. दरम्यान नातेवाईकांकडून पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण?


चिपळूणमध्ये राहणारी  23 वर्षीय निलिमा चव्हाण ही दापोलीमध्ये स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने कामाला होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने चिपळूणपासून दूर ती दापोलीमध्ये राहून नोकरी करत होती. तर ती शनिवार आणि रविवारी नियमितपणे तिच्या ओमळी गावाला जात असत.  मात्र  29 तारखेला दापोलीतून गावी येण्यासाठी निघालेली निलिमा घरी पोहचलीच नाही. त्यामुळे तिच्या भावाने तात्काळ चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली. अखेर दाभोळच्या खाडीमध्ये  पोलिसांना तिचा मृतदेह सापडला.   पण तक्रार केल्यानंतर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला नसल्यामुळे पुढचा अनर्थ घडला असल्याचा आरोप निलिमाच्या भावाने केला आहे. 


निलिमाचे वडिल गावातच सलून व्यवसाय करतात. त्यांनी दोन मुलांचे आणि एक मुलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. निलिमाची आई ही मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे वडिलांना हातभार लावावा या हेतून निलिमाने कमी वयात बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. पण निलिमाच्या अशा जाण्याने  तिच्या घरच्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मानसिक आजारातून हळूहळू सावरत असलेली तिची आई आता पुन्हा मुलीच्या जाण्याने खचली असल्याचं पाहायला मिळत आहे. 


तर या तपासात सीसीटीव्ही बाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पोलीस यंत्रणेकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज हे देखील उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे. कारण प्रशासनाकडून लाईट बिल न भरल्याने शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा काम करत नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. पण यामुळे  निलिमाच्या मृत्यूचा तपास करताना अडचण निर्माण होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


कोकणाच्या इतिहासातील पहिलीच घटना


आतापर्यंतच्या कोकणातील इतिहासात अशी घटना घडली नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि बदलत्या जीवनशैलीतील विकृतीमुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शासनाकडूनही याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. तर आता तरी पोलिसांच्या तपासाला यश येणार का आणि निलिमाचा मारेकरी सापडणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. 


हेही वाचा : 


Pune ATS New : दहशतवाद्याचं रत्नागिरी कनेक्शन! दहशतवाद्यांचा फंड मॅनेज? पुणे एटीएसकडून चौथ्या आरोपीला अटक