रत्नागिरी: जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी या ठिकाणच्या गोशाळेच्या जागेचा प्रश्न उपस्थित झाला असून ही गोशाळा चालवणारे भगवान कोकरे गेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. तरीही त्यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.


श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम गोशाळा लोटे एमआयडीसी खेड येथील गोशाळा कोकणातील सर्वात मोठी गोशाळा म्हणून ओळखली जाते. या गोशाळेची स्थापना 2008 ला झाली. सुरुवातीला या गोशाळेत 50 गुरे होती त्यानंतर अपघात जखमी झालेली, उनाड गुरे आणि तस्करी करताना पोलिसांच्या हाती लागलेली गुरे या गोशाळेत सोडली गेली. आज 2023 मध्ये  या गोशाळेला 15 वर्षे पूर्ण झालेली आहेत. मागील तीन वर्षे गोशाळेसाठी संकटाची गेली. त्यात कोविडची दोन वर्षे आर्थिक बाबतील हालाखीची गेली. ही गोशाळा चालवण्यासाठी, गोशाळेतील गाईंच्या चाऱ्यासाठी मासिक 15 लाख खर्च येतो. इतका खर्च आणायचा कुठून? हा प्रश्न भगवान कोकरे यांना पडला. 


अशा परिस्थितीत कोविड काळातील दोन वर्षे कोकरे महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेतून काढून आजवर या गोशाळेतील गाईना जगवले. आज ही गोशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. याचं एकमेव कारण म्हणजे गुहागर-खेड मतदारसंघात गेली दोन वर्षे होणारी गोहत्या, गोतस्करी याचे वाढते प्रमाण. त्यामुळे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मतदारसंघात या वारंवार घटना घटना का घडतायत यासाठी अधिवेशनात या विषयाची लक्षवेधी मांडली. त्यानंतर त्याची तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशाने या गोशाळेची चौकशीही सुरु झाली. पण अहवाल मात्र गुलदस्त्यातच राहिला. 


त्यानंतर सोनगावच्या ग्रामस्थांनी आपल्याला या गोशाळेचा त्रास होतोय. त्यामुळे इथून गोशाळा हटवावी म्हणून सबंधित प्रशासनाला पत्रव्यवहार करुन चिपळूण खेर्डी येथील एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणही केले. या उपोषणाला प्रशासनाने लेखी उत्तर दिले येत्या दिवसांत गोशाळा तेथून हटवण्यात येईल. त्यानंतर गोशाळा चालक भगवान कोकरे यांनी गोशाळा सबंधित प्रशासनाकडे दाद मागितली. प्रशासनाने लक्ष न दिल्याने भगवान कोकरे यांनी गोशाळेच्याच ठिकाणी गेल्या महिन्यात आमरण उपोषण केले. त्यानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी सध्याच्या सरकार मधील रामदास कदम यांच्या शिफारशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यागोशाळेसाठी मार्ग काढू असे पत्र दिले. त्यानंतर आमदार भरत गोगावले उपोषण स्थळी येऊन उपाशीपोटी असलेल्या गाईंचे उपोषण सोडून आश्वासन दिले. 


माजी खासदार निलेश राणे ही उपोषण स्थळी आले आणि उपोषण स्थगित करायला लावले. आम्ही आपल्या सर्व मागण्या पूर्ण करु असे आश्वासनही दिले. मात्र उपोषण होऊन महिना झाला तरी देखील ज्या-ज्या आमदारांनी आश्वासन दिले ते प्रशासकीय यंत्रणेकरुन पूर्ण झाले नाही. म्हणून पुन्हां एकदा गोशाळा चालक भगवान कोकरे यांनी उपोषणाचा मार्ग या 10 एप्रिल पासून स्वीकारला. आज आज आमरण उपोषणाला बसून भगवान कोकरे यांच्या उपोषणाचे आठ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही स्थानिक लोकप्रतिनिधी, मायबाप सरकार, स्थानिक मंत्री, स्थानिक प्रशासन आठ दिवसांत एकदाही उपोषणाकडे फिरकले सुद्धा नाहीत. या उपोषणामुळे गोशाळेतील गाईच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्याभरात गाईना पौष्ठिक चारा मिळत नसल्यामुळे 12 गाईंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण असा सवालही गोप्रेमींकडून केला जातोय.


ज्या गाईला गोमाता म्हणून पूजलं जातंय तीच गोमाता आता संकटात आली आहे. चाऱ्यावीणा भुकेलेल्या गाई हंबरडा फोडत आहेत. तर काही वासरू मृत्यूच्या वाटेवर आहेत.असे म्हटले जात की गाईच्या पोटात 33 कोटी देवाच वास्तव्य असत. मग त्या गोमातेकडे लक्ष का दिले जात नाही? का जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातय? सरकार अजून कसला विचार करताय, अजून किती गाई मरायची वाट बघतय?