मुंबई : कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी, चहापानासाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेली शिक्षकांची ड्युटी रद्द करण्यात आली आहे. कोकणातील चाकरमान्यांसाठी स्वागतासाठी राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. एबीपी माझाने या संबंधित बातमी प्रसारित केल्यांतर त्याची दखल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आणि हा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. 


काय होता आदेश? 


कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या बाबतीत नियोजन करण्यासाठी चक्क प्राथमिक शाळेतील शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यामध्ये या चाकरमान्यांचे स्वागत करणे, त्यांच्या चहापानाची व्यवस्था करणे आणि त्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करणे या गोष्टींचा समावेश होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या केवळ राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची या कामी ड्युटी लावण्यात आली होती.


एबीपी माझाने या संबंधी एक बातमी प्रसारित केली. माझाच्या बातमीची राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दखल घेतली आणि हा निर्णय रद्द केल्याचं जाहीर केलं. अवघ्या 12 तासांच्या आत शिक्षकांची ड्युटी रद्द करत असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. 


मुंबई - गोवा हायवेला लागूनच राजापूर एसटी आगार आहे. या आगाराच्या बाहेर मुंबई गोवा हायवेवर चाकरमान्यांसाठी स्वागत कक्ष उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी त्यांचे चहापान आणि स्वागत करण्यासाठी पोलीस तसेच महसूल विभागाचे कर्मचारी असणार आहेत. त्यांच्या जोडीला शिक्षकांनीदेखील काम करावं असं स्पष्ट करण्यात आलं होतं. दररोज तीन शिक्षकांनी किमान आठ-आठ तास ड्युटी या ठिकाणी करावी असं वरुन सांगण्यात आलं होतं.


याबाबत शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला होता. या संपूर्ण विषयावरती एबीपी माझाने राजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस. ए. कडू यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी सदरचा निर्णय हा प्रांत आणि तहसीलदार मॅडम यांच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे असं सांगितलं. दररोज केवळ तीन शिक्षक राजापूर एसटी आगाराबाहेर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत असतील. एक शिक्षक रोज आठ तास ड्युटी करेल. त्यानंतर पुढील 13 दिवसांमध्ये त्याला अशा प्रकारचं काम लागणार नाही असंही शिक्षकांना सांगण्यात आलं होतं. सुट्टीसाठी जिल्हा बाहेर न गेलेले, शिवाय राजापूरपासून जवळच असलेल्या शिक्षकांची ड्युटी यासाठी लावण्यात आली होती. 


राजापूर तालुक्यात जवळपास 850 शिक्षक आहेत. त्यापैकी 39 शिक्षकांची ड्युटी ही स्वागत कक्षात लावण्यात आली होती. पण शिक्षक संघटनांनी याला आक्षेप घेतला होता.