मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत विनायक राऊत यांच्या विरोधात तक्रारीचा पाढाच वाचला. विधानसभेत झालेल्या पराभवाला विनायक राऊत हेच जबाबदार असून त्यांचे उदय सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. त्यावर विनायक राऊतांना पक्षातून काढू का असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे. तसेच तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना सुनावल्याची माहिती आहे. 


राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू होती. या चर्चा सुरु असतानाच राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी साळवी यांनी पराभवानंतरच्या आपल्या भावना उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केल्या. मतदारसंघात ज्या गोष्टी घडत होत्या, त्या उद्धवसाहेबापर्यंत पोहचवल्याचं यावेळी राजन साळवींनी म्हटलं. आता उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, असं राजन साळवींनी यावेळी म्हटलं.


उद्धव ठाकरे-राजन साळवींच्या भेटीत नेमकं काय घडलं?


कोकणातील निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेत त्यावर पाऊण तास चर्चा केल्याची माहिती आहे. राजन साळवी यांच्यासोबत यावेळी तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते. 


राजन साळवींनी माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं. त्यावेळी साळवींनी विनायक राऊतांच्या विरोधात उद्धव ठाकरेंकडे तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती आहे.  राजन साळवींच्या तक्रारीनंतर उद्धव ठाकरेंनी विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का असा उलट प्रश्न राजन साळवींना विचारला. 


त्यावर राजन साळवींनी विनायक राऊतांना 21 हजाराचं लीड दिल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे मी त्याला जबाबदार कसा? असा उलट प्रश्न केल्याची माहिती आहे. 


विनायक राऊतांना पक्षातून काढून टाकू का? 


राजन साळवी यांनी केलेल्या प्रश्नावर मात्र उद्धव ठाकरे भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुमच्या म्हणण्यानुसार आता काय करायचं? विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर राजन साळवी यांनी तो आपला निर्णय आहे असं उत्तर दिल्याची माहिती आहे.  


तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा


विनायक राऊत आणि जिल्हाप्रमुखांचे शिंदे गटाचे नेते उदय सामंत, किरण सामंत यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे आरोप राजन साळवींनी केले. राजन साळवींनी विनायक राऊतांच्या विरोधात तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांचा पाणउतारा केल्याची माहिती आहे. तुम्हाला भाजपमध्ये जायचं असेल तर जा असं उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना सुनावल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: