Ratnagiri : गेल्या पाच दिवसांपासून कीर्तनकर भगवान कोकरे महाराज (Bhagwan Kokare Maharaj) यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. खेड (Khed) तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेत त्यांचं उपोषण सुरु आहे. जोपर्यंत या गोशाळेची जागा या संस्थेच्या नावावर होत नाही किंवा जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असं गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी सांगितलं आहे. उपोषणामुळे कीर्तनसेवा बंद असल्याने गोशाळेतील गायींच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी गोशेळेची पाहणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम सेवा संस्था संचालित गोशाळेची 2008 मध्ये स्थापना झाली. सुरुवातीला या गोशाळेमध्ये 40 ते 50 गाई म्हशींनी सुरुवात झाली होती. त्यानंतर आता जवळपास 1100 गुरांची संख्या झाली आहे. त्यामुळं आता गोशाळा चालवायची कशी? या गुरांच्या चाऱ्या पाण्यासाठी महिन्याला लागणारा 40 ते 45 हजार रुपयांचा खर्च आणायचा कोठून? असा प्रश्न समोर असतानाही गेली 15 वर्ष या गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे महाराज हे या गाईंना कीर्तन सेवा करुन सांभाळत आहेत. या कीर्तन सेवेतून येणारे पैसे आणि लोकांकडून येणारी मदत याच्यावरती आजपर्यंत या गाईंचा चारा पाण्याचा प्रश्न सुटत होता. मात्र गेली तीन वर्ष ही गोशाळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
गोशाळा का सापडली वादाच्या भोवऱ्यात
ही गोशाळा वादात पडण्याचं नेमकं कारण म्हणजे गुहागर-खेड मतदारसंघात गेल्या काही वर्षांमध्ये होणाऱ्या गो तस्करी, गो अवैद्य वाहतूक या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळं या मतदारसंघाचे विद्यमान आमदार सध्याचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी अधिवेशनात या घडणाऱ्या प्रकारांची लक्षवेधी मांडली होती. त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी आणि दोषींवरती कारवाई व्हावी अशी ही मागणी केली होती. या मागणीनंतर त्या वेळचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या मतदारसंघात खेड एमआयडीसीमध्ये असलेल्या गोशाळेची चौकशी झाली परंतू, अहवाल अजूनही सर्वांसमोर आलेला नाही. काही काळानंतर यामध्ये राजकीय वातावरण किंवा राजकीय रंग पाहायला मिळाला. गोशाळा असलेल्या बाजूच्या सोन गावातल्या रहिवाशांनी या गोशाळेचे मलमूत्र आणि सांडपाणी गावच्या ओढ्यामध्ये येऊन या ओढ्यावरती आधारित असलेल्या विहिरी आणि बोरवेलचे पाणी दूषित होते. त्यामुळं आम्हाला आजार येतात अशी तक्रार संबंधित एमआयडीसी कार्यालयात केली. एवढेच नाही तर सोनगावचे रहिवाशी या एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले.
सरकारने गोशाळा न हटवण्याचे आश्वासन दिले होते
त्यानंतर संबंधित प्रशासनाने यावरती निर्णय घेऊन येत्या दीड महिन्यात म्हणजेच 45 दिवसांमध्ये येथील गोशाळेला पर्यायी जागा देण्यात येईल असे म्हटले होते. तसेच गावकऱ्यांना लेखी निवेदनही दिले होते. त्यानंतर गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी प्रशासनाकडे दाद मागितली होती. जर गोशाळा या जागेवरुन हटवली तर या 1100 गुरांचे काय करायचे? यावरती प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही, म्हणून भगवान कोकरे यांनी दीड महिन्यापूर्वी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला. उपोषणाला बसल्यानंतर चौथ्या दिवशी सध्याच्या सरकारमधले आमदार भरत गोगावले, माजी खासदार निलेश राणे, आमदार योगेश कदम आणि सध्याचे सरकारमधील शिवसेनेचे नेते रामदास कदम अशा विविध सरकारमधील लोकप्रतिनिधी नेत्यांनी आश्वासन दिले होते की ही गोशाळा आम्ही तोडू देणार नाही किंवा हटवून सुद्धा देणार नाही.
कोणतेही लेखी आदेश न दिल्यामुळं पुन्हा आंदोलन सुरु
उपोषण स्थगित झाल्यानंतर गोशाळा संस्थापक भगवान कोकरे यांनी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाचा पाठपुरावा केला. प्रशासकीय फेऱ्या मारल्या तरीही जे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनाला प्रशासनाकडून यश मिळत नव्हते. कोणत्याही कागदपत्रांवर लेखी प्रशासकीय अधिकारी देत नव्हते. त्यामुळं संस्थापकांनी चार दिवसापासून आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
भगवान कोकरे यांची प्रकृती खालावली
गोशाळेच्या संस्थापक भगवान कोकरे यांची प्रकृती खालावली आहे. सध्या गो शाळेचे संस्थापक आणि तेथील कर्मचारी हे गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसल्यामुळं गोशाळेतील गाई वासरांना वेळेवरती चारा पाणी मिळत नाही. जोपर्यंत या गोशाळेची जागा या संस्थेच्या नावावरती होत नाही किंवा जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असं गोशाळेचे संस्थापक भगवान कोकरे यांनी सांगितले आहे.
पशुसंवर्धन विभागाची गोशाळेला नोटीस
दरम्यान पशुसंवर्धन विभागाने या गोशाळेसाठी आत्तापर्यंत दिलेले 75 लाखांचे अनुदान व्याजासह वसुल का करू नयेत याबाबत गोशाळेला नोटीस बजावली आहे. गेल्या 15 वर्षांपासून एकच ठिकाणी 1100 गायींचे संगोपन करणाऱ्या गोशाळेचे भवितव्य यामुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कीर्तनकर भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती अधिक खालवली आहे. उन्हाळ्यात अन्न आणि पाण्याविना राहणे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आपण आमरण उपोषण थांबवणार नसल्याचा निर्धार कीर्तनकर भगवान कोकरे महाराज यांनी केला आहे. तसेच गोशाळेला 75 लाखांच्या वसुलीची नोटीस काढणाऱ्या पशु संवर्धन विभागाने कोणतीही खतरजमा न करता या गोशाळेमध्ये गायीसाठी शेड, विहीर, चारा लागवड, गोबर गॅस प्रकल्प, सिंचन हे सर्व उपक्रम राबवलेले असतानाही ते राबवले नसल्याचे नोटीसमध्ये नमूद केल्याचा आरोप भगवान कोकरे महाराज यांनी केला आहे.
आत्तापर्यंत चार गाईंचा मृत्यू
आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस उजाडला तरी हे उपोषण थांबवण्यासाठी कोणतेच प्रयत्न सध्या केले जात नाहीत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दोन गायींचा मृत्यू झाला तर चौथ्या दिवशी आणखी दोन गायींचा मृत्यू झाला आहे. गोशाळेचे संचालक कीर्तनकर भगवान कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण सुरु असल्याने त्यांची कीर्तनसेवा बंद आहे. त्यामुळे गोशाळेतील गायींच्या चऱ्याचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडू गोशाळेची तपासणी
पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोशाळेतील गायींची तपासणी केली असता जवळपास 40 ते 50 गायी कमकुवत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे उपोषण वेळीच थांबवण्यात आले नाही तर चाऱ्याअभावी उपासमारीमुळं अनेक गायींचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाने काढलेली नोटीस ही वस्तुस्थितीची खातरजमा न करता काढली असून शासनाने एक समिती नेमून आतापर्यंत झालेल्या खर्चाची चौकशी केली तर सर्व काही स्पष्ट होईल असा दावा देखील भगवान कोकरे महाराज यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: