Konkan Refinery Project:  मागील काही महिन्यात राज्यातून काही मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असताना आता राज्य सरकार कोकणातील रिफायनरी प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकार पुढील आठवड्यात या प्रकल्पाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. तर, दुसरीकडे रिफायनरी विरोधकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना तडीपार का करू नये अशी विचारणा या नेत्यांना करण्यात आली आहे. 


कोकणातील रिफायनरीविरोधातील आंदोलन मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. याच आंदोलकांच्या नेत्यांना आता तडीपारी का केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस उपविभागीय पोलिस कार्यालयानं पाठवली आहे. त्याबाबत उत्तर देण्यासाठी या नेत्यांना 3 नोव्हेंबरपर्यंतची देखील तारीख देण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव इथं रिफायनरीसाठी चाचपणी केली जात आहे. पण, त्याचवेळी रिफायनरीविरोधी आंदोलनातील नेत्यांना नोटीस पाठवल्यानं एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 


तर, दुसरीकडे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मात्र रिफायनरीबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे. सामंत हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून आंदोलकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. रिफायनरीविरोधी आंदोलकांनी सर्वेक्षणाविरोधात भाजप नेते निलेश राणे यांची गाडी अडवली होती. 


रिफायनरी कोकणात व्हावी यासाठी सध्या जोरकसपणे प्रयत्न केले जात आहेत. पण, विरोध तीव्र असल्यानं माती परीक्षण, ड्रोन सर्व्हेक्षणसारखी कामं देखील पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान, पोलिसांनी विरोधकांच्या नेत्यांना पाठवलेल्या नोटीसीमध्ये, तुमच्या विरोधात अभिकथन स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पण, त्यानंतर देखील तुमच्या प्रवृत्तीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवळ, बारसू  शिवनेखुर्द या परिसरातील शांतताप्रिय जनतेच्या जीवितास धोका भय व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून लोकांना जीवन जगणे असह्य झाले असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.  राजापूर पोलीस निरीक्षक यांनी तुम्हाला या कारणास्तव हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. याबाबत तुम्हाला खुलासा करावयाचा असल्यास तुमचे बचावाचे दोन साक्षीदार, एक जामीनदार, पासपोर्ट साईजचे दोन फोटो, दहा रुपयाची रक्कम आणि आधार कार्डसह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय लांजा इथं 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उपस्थित राहून जबाब द्यावा. अन्यथा तुमच्या विरुद्ध चौकशीचे कामकाज सुरू राहील व त्याच्या परिणामांना तुम्ही पात्र राहाल असे या नोटिशीत म्हटले आहे. 


पोलिसांनी सत्यजीत चव्हाण, नरेंद्र जोशी, अमोल बोळे, नितीन जठार, दीपक जोशी आणि सतीश बाणे यांनी तडिपारच्या नोटिसा बजवाल्या आहेत. 


आठ दिवसात चित्र स्पष्ट होणार?


राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक आणणारा हा प्रकल्प आहे. लाखोंना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. मात्र, स्थानिकांनी केलेल्या विरोधामुळे प्रकल्पाबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही. पण, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढील आठ दिवसात कोकणातील रिफायनरी प्रकल्पाचं नेमकं भवितव्य स्पष्ट होणार आहे.