Ganesh Chaturthi 2022 : कोकणातील (Konkan) सण-उत्सवांमधला सर्वात मोठा म्हणजे गणेशोत्सव (Ganesh Utsav 2022). कोकणात मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव पार पाडतो. विविध रुपातील गणेश मूर्ती घराघरात विराजमान होते. परंतु बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या पाण्यात विसर्जन करतो त्याठिकाणचे पाणी दूषित होतं. हे पाणी काही काळ दूषितच राहते. हीच बाब लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील बोरगावमधला तरुण वैभव चव्हाणने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती (Ecofriendly Ganesh Idol) साकारल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मूर्ती ज्या पाण्यात विसर्जित करतात तिथलं पाणी शुद्ध होतं. 


कशा साकारल्या या गणेश मूर्ती?
वैभव चव्हाण हा उच्चशिक्षित तरुण चिपळूण तालुक्यातील बोरगाव मोरेवाडीत राहतो. त्याने यंदा नवीन प्रयोग करत शेवग्याचा पाला किंवा पावडर वापरुन गणेश मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींना बाहेरील गावातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. विशेष म्हणजे या मूर्ती वजनाने हलक्या आणि स्वस्त असल्याने पहिल्याच वर्षी साकारलेल्या सर्व मूर्ती संपल्या आहेत. सुरुवातीला लोक मातीच्या मूर्ती वापरायचे. त्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वापर वाढला. याच्या वापरामुळे बहुतांश मूर्ती विसर्जनानंतर पाण्यात विरघळत नसल्याने काही वेळा त्यावर बंदी सुद्धा आली होती. हाच विचार करुन वैभव चव्हाणने नवीन प्रयोग करुन गुणकारी शेवग्याचा पाला किंवा पावडर आणि दुर्वा मिश्रित गणेशमूर्ती साकारल्या आहे. या गणेश मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या असता तिथलं पाणी दूषित न होता शुद्ध होतं.


शेतीविषयक शिक्षणामुळे पर्यावरणपूरक प्रयोग
बारावीनंतर शेतीविषयक शिक्षण घेतल्यानंतर वैभव चव्हाणने प्रत्येक प्रयोग शेतीविषयक पर्यावरणपूरक केले आहेत. शेतीविषयक शिक्षण घेतल्यानंतर त्याने नोकरी न करता, तो गणेश मूर्ती साकारण्याच्या कलेकडे वळला. कोकणात लाखों गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होते आणि विसर्जनही होते. त्यामुळे संबंधित ठिकाणचे पाणीही मोठ्या प्रमाणावर दूषित होतं. शाडूच्या मातीच्या मूर्ती या वजनाने जड असतात तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वजनाने हलक्या असल्या तरी पर्यावरणासाठी घातक असतात. त्यामुळे यावर तोडगा म्हणून चिपळूणच्या वैभव चव्हाण या तरुणाने पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या आहे, ज्यातील घटकांमुळे प्रदूषण तर होत नाहीच पण विसर्जन केलेल्या ठिकाणचं पाणी शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळेच त्यांनी साकारलेल्या मूर्तींना पहिल्याच वर्षी प्रचंड मागणी होती.


संबंधित बातम्या


Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पा मोरया... घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन


Ganesh Chaturthi 2021: बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पहाटे पावणे पाचपासून ते दुपारी पावणे दोनपर्यंत करा, पंचागकर्ते पंडित मोहन दाते यांची माहिती