Maharashtra Politics: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल खेडमध्ये (Khed) जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप (BJP) आणि शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena) यांच्यावर निशाणा साधला. सगळं चोराल पण शिवसेना चोरू शकणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) घणाघाती टीका केली. तसेच, भाजपलाही फैलावर घेतलं. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, नाकाखालून 40 जण निघून घेल्याची निराशा सभेत दिसल्याची टीकाही फडणवीसांना केली आहे.
आम्ही हेरलं म्हणून त्यांना चोरलं : उपमुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांची काल (5 मार्च) खेड येथे जाहीर सभा घेण्यात आली. त्या सभेत भाजपवरील टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "तेच शब्द, तिच वाक्य, तेच टोमणे या व्यतिरिक्त काहीही नवीन यांच्याकडे नाही, खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा तसेच त्यांच्या भाषणात हताशपणाही दिसून येत होता. त्यामुळे अशा हताश भाषणावर आणि टोमण्यांवर काहीही प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडीत आले असून यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील चषकचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोदी सरकारच्या 'हर घर जल, हर घर नल' या योजनेचा केक तयार करण्यात आला होता. हा केक कापून मंत्री कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर भन्नाट अशी फलंदाजी केली तर दुसरीकडे केकवर बच्चेकंपनीनं ताव मारला .
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कपिल पाटील यांना शुभेच्छा देत म्हणाले की, लोकोपयोगी काम करणारा नेता म्हणून कपिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. आर. आर. पाटील जे कपिल पाटील यांच्या विषयी बोलले तेच आम्ही हेरलं आणि कपिल पाटील यांना त्यांच्याकडून चोरलं होतं, असं फडणवीस म्हणाले
एकीकडे आशिर्वाद यात्रा सुरू आहे तर खेड मध्ये शिवीगाळ यात्रा सुरू आहे : उदय सामंत
खेडमधील सभा ही खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाची सभा नव्हती, यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते आले होते. त्यामुळे योगेश कदम यांना पराभूत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना या ठिकाणी यावं लागतं, त्यातच कदम यांचा विजय आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या चौपट सभा मुख्यमंत्री लवकरच घेणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाची आशीर्वाद यात्रा सुरू आहे. मात्र खेडमधील शिवीगाळ, गद्दार आणि खंजिर यात्रा सुरू असल्याची टीका उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही आमदार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
रात्री उशिरा कपिल पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री भिवंडीत
कपिल पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा भिवंडीत हजेरी लावली. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. काल (रविवारी) कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक नेतेमंडळींनी भिवंडीत त्यांच्य निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्यात.