Shashikant Warise : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे ( journalist Shashikant Warise) यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी एसआयटी (SIT) मार्फत होणार आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. वारिसे यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात यावी अशी मागणी होत होती. अखेर आज मृत्यूच्या पाच दिवसानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शशिकांत वारिसे यांचा 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचार सुरू असतानाच 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी कारचालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक करण्यात आली असून हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय हा मुद्दा उचलून धरला होता.
दरम्यान, या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या प्रकरणाची सखोर चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. "शशिकांत वारिसे यांची हत्या प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तर संजय राऊत यांनी या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिंलं होतं. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करू असे म्हटले आहे. "वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी करू. शिवाय हे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये कसं नेता येईल हे बघू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला. त्यानंतर उपचार सुरू असताना 7 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीने जोरात धडक दिली होती. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संजय राऊतांचे गंभीर आरोप
रिफानरीच्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातून शशिकांत वारिसे यांची हत्या झाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. "व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या आसपास जमिनी विकत घेतल्या आहेत. हे कोण व्यापारी आहेत याची यादीच जाहीर करणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. आमचे स्थानिक आमदार वारिसे कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. माझी मागणी आहे की वारिसे कुटुंबियांना तातडीनं 50 लाखांची मदत द्यावी. हा सरकारनं केलेला खून असल्याचा आरोपही राऊतांनी केला. मला पण याबाबत दोनदा धमकी आली आहे की वारिसेंचा मुद्दा उचलाल तर तुमचाही वारिसे करू. पण एका पत्रकाराची हत्या ही एका सैनिकाची हत्या आहे. त्यामुळं मी हा मुद्दा मांडणारच, मी कुणाला भीत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अपघात की घातपात?
वारिसे यांच्या अपघाती मृत्यूनंतर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. वारिसे यांनी 6 फेब्रुवारी रोजीच रिफायनरीशी संबंधित काही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. मुख्यबाब म्हणजे ज्या थार गाडीनं त्यांना जोराची धडक दिली त्याच पंढरीनाथ आंबेरकर यांच्याशी ही बातमी निगडीत होती. त्यामुळे बातमी प्रसिद्ध होणे आणि वारिसे यांना आंबेरकर यांच्या गाडीची धडक बसणे हा निव्वळ योगायोग आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.