Ratnagiri: चिपळुण शहरातून जाणाऱ्या वाशिष्ठी नदीतील (Vashishthi River) गाळ उपसा नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जात असून त्याला जलसंपदा यांत्रिकी विभागाकडून इंधन पुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिन्यात इंधनासाठी उपलब्ध झालेला 35 लाख निधी संपल्याने सोमवारपासून फाऊंडेशनने गाळ उपसा थांबवला आहे.  


महापुरानंतर गेली दोन वर्षे वाशिष्ठी नदीतून गाळ उपसा सुरू आहे. मात्र गतवर्षी ज्या वेगाने उपसा झाला ते पाहता यावर्षी गाळ उपशाकडे फारसं कुणी लक्ष देताना दिसत नाही. यावर्षी जलसंपदा यांत्रिकी विभाग शांत असताना नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मात्र गाळ उपसा सुरू आहे. नाम फाऊंडेशनला यंत्रसामुग्रीसाठी इंधन पुरवठा जलसंपदा विभागाच्या अलोरे यांत्रिकी विभागामार्फत केला जात आहे.


इंधन पुरवठ्यासाठी संस्थेस 1 कोटी 30 लाख दिले जाणार होते, त्यानुसार 18 एप्रिलपर्यंत 1 कोटी 20 लाखांचे इंधन पुरवले. मात्र थोडा निधी शिल्लक राहिल्याने आणि पुढील निधी कधी उपलब्ध होईल हे सांगता येत नसल्याने नदीतील गाळ काढण्यासाठी तयार करण्यात आलेले अडथळे त्वरित दूर करावेत, अशा सूचना पाटंबधारे खात्याने नाम फाऊंडेशनला गेल्या एप्रिल महिन्यात केल्या होत्या. 


अशात गाळ उपशाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील शिल्लक कामांसाठी 5 कोटी 21 लाखांचे अंदाजपत्रक यांत्रिकी विभागाकडून तयार करण्यात आले असताना त्यातील 4 कोटी 86 लाखांच्या खर्चाला तीन महिन्यांनी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. मात्र हा निधी त्वरीत मिळेल याची शक्यता नाही, त्यामुळे गाळ उपसा थांबणार नाही, यादृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन समितीकडून खेड, संगमेश्वरला मंजूर झालेला निधी तात्पुरत्या स्वरूपात चिपळुणमधील नाम फाऊंडेशनला वर्ग केला.
  
22 जुलै 2021 रोजी वाशिष्ठी, शिवनदीला आलेल्या महापुराने शहर परिसराची पुरती वाताहात झाली आणि संपूर्ण राज्यात चिपळूण चर्चेत आले. चिपळुणच्या गाळ उपशासाठी 10 कोटी 28 लाख निधी आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. गतवर्षी 13 किलोमीटर लांबीच्या वाशिष्ठी नदीत गाळ उपशासाठी राज्यभरातून यंत्रसामुग्री आणून जलसंपदा विभागाने गाळ उपसा केला. मात्र गतवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र संपूर्ण उन्हाळा कोरडा गेला आहे. विशेष म्हणजे गाळ काढणाऱ्या नाम फाऊंडेशनलाही इंधन पुरवठयासाठी निधी उपलब्ध केला जात नाही.


पावसाळा संपल्यानंतर गाळ उपशासंदर्भात मंत्रालय पातळीवर झालेल्या बैठकांत निधी उपलब्धतेच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून यावर्षी गाळ उपशासाठी एकही रूपया निधी उपलब्ध झालेला नाही.


सध्या नाम फाऊंडेशनने यंत्रसामुग्री लावून उक्ताड, पेठमाप आणि गोवळकोट आदी ठिकाणी 7 पोकलेन, 20 डंपर या माध्यमातून गाळ उपसा सुरू होता. मात्र गुरूवारपासून तो पुर्णपणे थांबला आहे आणि यंत्रसामुग्रीसह डंपर नदी काठावर उभे आहेत.


हेही वाचा:


Khadakwasla Dam : बारशाला आलेल्या मुलींचा खडकवासला धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, नऊ मैत्रिणी बुडाल्या, दोघींचा मृत्यू