Raigad Suspicious Boat: रायगड येथील संशयित बोट प्रकरणाचा तपास एटीएस करणार आहे. एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल (ATS Chief Vineet Agrawal) बोटीच्या ठिकाणी दाखल झाले आहेत. गुरुवारी सकाळी बोटीमध्ये एके-47 रायफल्स सापडल्यामुळे खळबळ माजली होती. मुंबई पुण्यासह राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या प्रकरणामुळे रायगडमध्ये सर्व तपास पथकांनी धाव घेतली होती.
महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल गुरुवारी सायंकाळी बोटीच्या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी सर्व पाहणी केली आहे. बोटीमध्ये मिळालेल्या साहित्याचीही त्यांनी पाहणी केली. तेथील अधिकाऱ्यांशी अग्रवाल यांनी संवाद साधला. तसेच पुढील तपासाची दिशा काय असेल याची चाचपणी केली.
बोटीच्या ठिकाणी दाखल होण्यापूर्वी विनीत अग्रवाल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'रायगडमध्ये बोट जप्त करण्यात आली असून त्यामध्ये तीन एके-47 रायफल्स आढळल्या आहेत. याबाबत सध्या तपास सुरु आहे. बोटीमध्ये काही कागदपत्रांसह सामानही आढळले आहे. बोट समुद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.'
रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही - गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
‘रायगडच्या किनाऱ्यावर सापडलेली बोट (Raigad Suspected Boat ) ही लेडी हान नावाची असून याची मालकी ऑस्ट्रेलियाच्या एका महिलेची आहे. ही बोट मस्कतहून युरोपला जात होती. बोटीचं इंजिन खराब झालं. बोटीतील प्रवाशांना कोरियन युद्धनौकेने वाचवले आहे. पाणी तुंबल्याने बोट ओढता आली नाही आणि त्यामुळे ती वाहून गेली. हीच ती बोट असल्याचे नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने सांगितले आहे. बोटीवरील स्टिकर व कागदपत्रांवरून थेट कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी ही बोट आमचीच आहे आणि ती ओमानच्या समुद्रात पलटी होऊन वाहून गेल्याची माहिती नेपच्यून सेक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीने दिली. केंद्रीय यंत्रणांकडून देखील याबाबत खात्री करण्यात आली आहे. शिवाय बोट जप्त करून तपासण्यात आली असली तरी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निदवेदन दिले आहे. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
बोटीमध्ये एके 47 -
रायगडमधील श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्या. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ओमान देशातील बोट -
हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट (Raigad Suspected Boat) ओमान देशातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती. या बोटीतील व्यक्तींची ओमानजवळच सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी अशी माहिती सूत्रांनी दिली.