Konkan refinery Latest Update: कोकणातल्या नाणार (Nanar Refinery) येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगाव इथं रिफायनरी प्रस्तावित आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह दिल्ली दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याचंच फलित समोर आलं आहे. कारण आता कोकणातल्या रिफायनरीबाबतचा महत्त्वाचा तपशील पुढे आला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri petroleum minister) यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. कोकणातील रिफायनरी तसेच बारसू सोलगावबाबत सकारात्मक चर्चा उदय सामंत आणि पुरी यांच्यामध्ये झाली आहे.
स्थानिक पातळीवरील घडामोडींचा विचार
अर्थात याबाबत स्थानिक पातळीवर नेमक्या काय घडामोडी आहेत? विरोध, समर्थन, जमीन मालकांची परवानगी याचा सारासार विचार केला जाईल. शिवाय बैठकीच्या आणखीन काही फेऱ्या होतील अशी माहिती देखील आता समोर येत आहे. त्यामुळे उदय सामंत उद्योगमंत्री झाल्यानंतर कोकणातल्या रिफायनरीबाबतच्या घडामोडी सध्या वेगाने घडताना दिसून येत आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार राजन साळवी हे रिफायनरी समर्थनार्थ आहेत. माझा रिफायनरीला पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिलेली आहे.
कोकणात 60 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभारणं शक्य आहे असं सांगितलं जात आहे. त्याचे उत्तर म्हणजे नाणार. नाणार या ठिकाणची रिफायनरी रद्द झालेली असली तरी या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा आणि पूर्वी प्रस्तावित असलेल्या रिफायनरीची क्षमता ही 60 मिलियन मेट्रिक टन इतकी होती. पण त्याच वेळेला बारसू आणि सोलगाव या ठिकाणी उभारली जाणारी रिफायनरी ही 20 मिलियन मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची आहे.
त्यामुळे रिफायनरीची क्षमता कमी करून कोकणाच्या आर्थिक विकासामध्ये बाधा नको. नाणारमध्ये मुबलक प्रमाणात जागा उपलब्ध होत असल्यास त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेची अर्थात 60 मिलियन मॅट्रिक टन क्षमतेची रिफायनरी उभी करावी असा देखील एक सूर अद्यापही नाणार या ठिकाणाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचा आहे.
यापूर्वी एकाच ठिकाणी मोठ्या क्षमतेची रिफायनरी उभारणं अशक्य झाल्यास तिचं विभाजन व्हावं. अर्थात दोन ते तीन टप्प्यांमध्ये रिफायनरी उभारावी किंवा उभारली जाईल अशी चर्चा देखील रंगली होती. तसेच नवी दिल्ली इथं काही दिवसांपूर्वी बोलताना महाराष्ट्र किंवा रत्नागिरीच नव्हे तर देशातल्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागाचा विचार केल्यास या ठिकाणच्या कोणत्याही भागात रिफायनरी उभारली जाईल असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या