रत्नागिरी : ग्रामीण रस्त्याच्या विषयावरून भाकर जाधव विरुद्ध भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यातला संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून आलं. पाथर्डी, मिरवणे, उमरोली गवतल्या रस्त्याच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन केलं. त्यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी भाजपचे माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका केली. 2014 ते 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यांनी एक रुपया तरी आणला का? हे मुकं, बहिरं आणि मंद बुद्धीचं लोकांची कामं करणार का? असा सवाल त्यांनी विचारला
गुहागर विजापूर मार्गावरील गुढे फाटा येथे हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावर उतरले. त्यावेळी राज्य सरकारवर आरोप करताना भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याचं पाहायला मिळालं. पोलिस आणि बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर भास्कर जाधव यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं. पण रस्ता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
भास्कर जाधव यांनी भाजपच्या विनय नातू यांचा उल्लेख मंद बुद्धीचा नेता असा केला तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या पातळीत टीका केली. त्यामुळे भाजप विरुद्ध भास्कर जाधव संघर्ष चिघळण्याची शक्यता.
एकाच घरातील दहा माणसं मेली
भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना एकत्रित करून सांगितलं की या रस्त्यावरील अपघातात एकाच घरातील दहा माणसं मेली. आपलं राजकारण काही असो, राजकीय मतभेद काहीही असोत. इतरांना मदत करतात तशी त्यांना मदत करा अशी विनंती केली. पण यांनी एक रुपयाही दिला नाही. त्या समृद्धी महामार्गावर कितीतरी माणसं मेली, त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये दिले. पण एका गावातील, एकाच घरातील दहा माणसं मेली. यावर पालकमंत्र्यांनाही भेटलो. पण त्यांना मदत दिली नाही. या नालायकांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.
... तर अधिकाऱ्यांचा गणपती करू
कामं मंजूर करण्याचं पत्र देतील आणि लाडक्या बहिणीसारखं करतील, त्यांच्या मागे मिरवणारे चमचे आहेत त्यांना जवळही उभे करू नका असं म्हणत भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका केली. पाथर्डी, मिरवणे, उमरोली गवतल्या गावातील रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट एका नालायक माणसाला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं. पण त्याने काम नाही केलं तर आमचा गणपती कसा जाणार? रस्ता नाही झाला तर अधिकाऱ्यांचा गणपती करू असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात 2014 पासून 2019 पर्यंत देवेंद्र मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री होते. पण या मंद बुद्धीच्या माणसाने एक रुपया तरी आणला का असा प्रश्न विचारत भास्कर जाधव यांनी माजी आमदार विनय नातू यांच्यावर टीका केली.
ही बातमी वाचा: