Ratnagiri Agriculture News : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं नवनवीन संकटांना सामोर जावं लागतं. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अशातच बदलत जाणाऱ्या वातावरणाचा (Climate Change) देखील शेती पिकांना फटका बसत आहे. यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी कोकणात (Konkan) थंडी उशीराने सुरु झाली आहे. त्यामुळं कोकणातील आंबा (Mango) आणि काजू (Cashew) उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा (Hapus) मोसम उशिरा असणार आहे.


लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता


यावर्षी कोकणात उशिरानं थंडी सुरु झाली. त्यामुळं कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत. दरम्यान, सध्याची थंडी किंवा वातावरण पाहता यंदा हापूसचा मोसम उशिरा असणार आहे. कारण वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि लांबलेल्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंब्याचा हंगाम लांबल्यास मिळणाऱ्या दराबाबत देखील शेतकरी चिंतेत आहेत.




काही ठिकाणी आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव


बदलत्या वातावरणामुळं कोकणात काही ठिकाणी आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरु आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळं आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी झाडांना मोहर आलेला नाही तर काही ठिकाणी मोहरामध्ये फळधारणा झालेली आहे. यावरही बदलत्या हवामानाचा परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळं आंबा बागायतरांवर संकट निर्माण झालं आहे. 




फवारणीसाठी औषधांसाठी मोठा खर्च  


सध्या रत्नागिरी जिल्ह्यात हापूस आंब्यावर तु़डतुडा आणि थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याचा आंब्यावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळ हापूस आंब्याच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. बाग चांगली ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना औषधांसाठी मोठा खर्च करावा लागणार असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी यावेळी दिली आहे. या फवारण्याचा खर्चही मोठा असणार आहे. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. 


अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी


राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याचं चित्र दिसत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, जळगाव, धुळे या ठिकाणी पारा चांगलाच घरसला आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. दुसरीकडं मराठवाड्यात देखील गारठा वाढला आहे. तसेच मुंबईचे किमान तापमान 15 अंशावर गेले आहे. त्यामुळं मुंबईतही थंडी वाढली आहे. अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्या ठिकाणच्या रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे.