त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे त्याचा अर्थ राज ठाकरे बदलला असा होत नाही. मी तोच होतो जो पूर्वी आहे. माझी मतंही तीच आहेत जी पूर्वीपासून होती. रंग बदलून मी सरकारमध्ये जाणारा नाही, असं राज ठाकरे हे त्यांच्या भाषणात म्हणाले.
महाराष्ट्रात जे काही घडलं त्याबद्दल 25 मार्चला होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचंही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र आत्तापर्यंत त्यांनी या सगळ्या प्रयोगाबाबत काहीही भाष्य केलं नव्हतं. आजही त्यांनी याबाबत काही बोलणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी नेस्को मैदानावर मनसेचं पहिलं अधिवेशन आज मुंबईत आयोजित करण्यात आलं होतं. या अधिवेशनात झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी हा टोला लगावला.
यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली. मात्र त्यांनी जी चांगली गोष्ट केली त्यासाठी त्यांचं अभिनंदन करणाराही मीच होतो. अनुच्छेद 370 चा विषय असो किंवा राम मंदिराचा विषय असो नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा मीच होतो, असंही राज यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी पक्षाच्या संघटना बांधणीसाठी ज्यांना काम करायची इच्छा आहे अशा इच्छुकांनी स्वतःची नावं राजगड कार्यालयांत जाऊन नोंदवायची आहे. आणि ह्यासाठी सुधीर पाटसकर आणि वसंत फडके हे संघटनात्मक मांडणीचं आणि बांधणीचं काम करणार आहेत, असं सांगितलं. तसंच आपल्यातलेच अनेक जणं सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर ह्या सगळ्या माध्यमांचा वापर करून पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना आढळलं आहे, असले प्रकार ह्या पुढे मी खपवून घेणार नाही. आणि असे प्रकार आढळले तर त्यांची पदावरून गच्छन्ती अटळ आहे, असे ते म्हणाले.
संबंधित बातम्या