रायगड : बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतीचा कारभार देखील हायटेक झाला आहे. ग्रामपंचायतीत देखील नवे प्रयोग सध्या राबवले जात आहे. ग्रामपंचायतीचा कारभार (Gram Panchayat Governance ) पारदर्शक असावा, याकरता रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढवली आहे. ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी पूर्णपणे ऑनलाईन सुविधा दिली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी क्यूआर कोड बनविण्यात आले आहे. चेंढरे ग्रामपंचायत ऑनलाईन सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे.
ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी ऑनलाईन भरता येणार आहे. 'क्यूआर -कोड' मुळे आजच्या काळात आर्थिक व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. अलिबाग येथील चेंढरे ग्रामपंचयतीमध्ये प्रत्येक घरावर 'क्यूआर कोड' लावण्यात आले आहे. क्यूआर कोड' (QR Code) स्कॅन करून घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाईन सुविधा देणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
'स्कॅन करा आणि कर भरा'
प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्याचे 'क्यूआर - कोड' तयार करण्यात आले आहेत. यामुळे गावाचा विस्तार होत असताना तंत्रज्ञानाचा वापर करत गावातील प्रत्येक कुटुंबाला आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरता येणार आहे. कर भरण्यासाठी कार्यालयात न जाता थेट ऑनलाईन पद्धतीने क्यूआर स्कॅन करून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. यामध्ये, गावातील प्रत्येक घरावर क्यूआर कोडचे स्टिकर लावणार असल्याने ही समस्या कायमची सोडवण्यात येणार आहे. यासाठी विशेष सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. 'स्कॅन करा आणि कर भरा' ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. याच क्यूआर कोडच्या मदतीने गावकऱ्यांना त्यांच्या समस्यासुद्धा मांडता येणार आहे. गावातील सुमारे साडेआठ हजार घरांवर क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत.
क्युआर कोडच्या माध्यमातून वृक्षांची शास्त्रीय माहिती
पुण्यातील एम्प्रेस (Empress garden) या गार्डनमधील वृक्ष शेकडो वर्षं जुने आहेत. या गार्डनमधील सुमारे आठशे वर्ष जुन्या झाडांना आता क्यूआर कोड बसवण्यात आले आहेत. या क्युआर कोडच्या माध्यमातून वृक्षांची शास्त्रीय माहिती आणि त्यांचा इतिहास इथं येणाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे . काही दोनशे वर्षं जुने , काही अडीचशे वर्षं जुने तर काही तीनशे वर्षं जुने आहेत. काही झाडं प्रचंड व्यापलेली आहेत तर वेलींनेही मोठा परिसर व्यापला आहे. अभ्यासकांच्या मते एक वेल ही तीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे . या अशा दुर्मिळ वृक्षांची माहिती या वृक्षांवर बसवण्यात आलेल्या अशा क्यूआर कोडच्या सहाय्याने आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.