Raju Shetti: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (1 जुलै) दुर्गराज रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियानाची (Farmer awareness campaign) सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह पदाधिकारी व शेकडो शेतकरी किल्ले रायगडावर उपस्थित होते. यावेळी राजू शेट्टी यांनी राज्यकर्त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम बेगडी असल्याची खरमरीत टीका केली. 


'स्वाभिमानी'कडून शेतकरी जागृती अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर संपूर्ण राज्यात सर्व पिकांचा उत्पादन खर्च, सरकारला मिळणारा कर, शेतकऱ्यांना मिळणारा भाव व वाढलेल्या महागाईमुळे शेती उत्पादनावर झालेला परिणाम या सर्व बाबींचा समावेश असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. शिवारापासून ते गावातील वाडी वस्तीपर्यंत सभा बैठका घेऊन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच स्वाभिमानीचे पदाधिकारी अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती केली जाणार असल्याचे राजू  शेट्टी यांनी रायगडावरून सांगितले.


स्वदेशी लुटारुंच्या विरोधात शेतकरी, कष्टकरी, सामान्य लढतोय


अनेक नेते रायगडावर येऊन आशीर्वाद घेतात, पण त्यांना सत्ता प्राप्त करायची आहे. यांना शिवरायांच्या आज्ञापत्राची यांना विसर पडला आहे. राज्यकर्ते सांगतात, प्रजा आपलीच आहे, जेवढी लुटता येईल तेवढी लुटा, पण याद राखा आमचा हिस्सा आला पाहिजे, अशी स्थिती आहे. स्वदेशी लुटारुंच्या विरोधात शेतकरी, कष्टकरी, सामान्य लढतोय, त्याच्या लढ्याला यश द्या, ही कैफियत घेऊन रायगडावर आलो आहे त्याला यश द्या, अशी साद राजू शेट्टी यांनी रायगडावरुन घातली. 


धोरणांच्या बाबतीत फक्त बैठकीचा फार्स  


किल्ले रायगडावर राजसदर, होळीचा माळ तसेच समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर राजू शेट्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, शेतकऱ्यांसाठीची निती याची उदाहरण देत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. राजू शेट्टी म्हणाले की, राज्यकर्त्यांचे शिवाजी महाराजांवरील प्रेम बेगडी आहे. दहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही. सरकार शेतकऱ्यांच्या धोरणांच्या बाबतीत फक्त बैठकीचा फार्स करते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात जुन्या योजनांचे अनुदान, कृषी साहित्य वाटप अथवा शासकीय योजनांची जत्रा भरवली जात असून त्यातून शेतकरी प्रेम दाखविले जात आहे. 


शेतकरी ज्या वेळेला संकटात उभा होता, तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना उभ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पहिली कर्जमाफी, दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना बी-बियाणे,अनुदान देणे, गोदामाची कोठारी उभा करणे बैल जोडी, बंधारे, विहीरी, शेती साहित्य यासारख्या वस्तू मोफत वाटणे यामाध्यमातून पायाभूत सुविधा सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी उपलब्ध करून दिल्याचे राजू शेट्टी म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या