Shivrajyabhishek Din 2023 : आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. किल्ले रायगडावर न भूतो न भविष्यति असा झालेला ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ पार पडला. ही इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली घटना होती. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा 2 जून रोजी तिथीनुसार आणि 6 जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे.


आज तारखेनुसार साजरा होतोय शिवराज्याभिषेक सोहळा


शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्येयासाठी सुरू झालेल्या लढ्यातला आजच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला. शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला आणि रयतेचे लाडके शिवबा छत्रपती झाले आणि रयतेला वाली मिळाला. भारताच्या इतिहासातील हा फार मोठा दिवस आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती सर्वदूर पसरली असल्यामुळे, देशासह विदेशातही आज शिवराज्यभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. 


सार्वभौम राज्याची स्थापना


‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आलं. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. 


छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारलं


महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. यामुळे गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेनं ज्वलंत झाली. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले. 


संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा


स्वराज्याची राजधानी रायगडावर आज 350 वा शिवराज्याभिषेक दिन उत्सव सोहळा संपन्न होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. संभाजीराजे कुटुंबियांसह रायगडावर दाखल झाले आहेत. 350 व्या राज्याभिषेक निमित्ताने मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल झाले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील शिवप्रेमी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल झाले आहेत. 350 व्या राज्याभिषेकाचा उत्साह पाहून संभाजीराजे छत्रपती भावुक झाले. मी तर एक निमित्त आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. वभक्तांनी लाखोंच्या संख्येने हजेरी लावली आहे. हा फक्त शिवराज्याभिषेक सोहळा नाही तर उत्सव बनला आहे अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.