Weather Update: रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल (14 जून) रात्रीपासून उसंत घेतलेल्या पावसाने चिपळूण, गुहागर ,खेड, दापोली या भागामध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. काल दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे गुहागर, दापोली आणि खेड परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते. 

Continues below advertisement


गुहागरमधील साखरी आगरमध्ये शाळेच्या शेजारी दरड कोसळण्याची घटना घडली. असगोली गावात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे रस्ते वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. खेड दापोली भागामध्ये मुसळधार पावसामुळे अर्धवट राहिलेला रस्त्यांना तयार केलेले सर्विस रोड पाण्याखाली गेल्यामुळे मुख्य मार्गावरची वाहतूक बंद होती. जगबुडी आणि नारंगी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र, पावसाने उसंत घेतल्यामुळे पुराचा धोका टळला. असे असले तरी आज सकाळपासून संपूर्ण परिसरात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून इशारा पातळी ओलांडली आहे. 


साताऱ्यात दोन-तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग 


दुसरीकडे, साताऱ्यात गेले दोन-तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव तालुक्यातील धरणांच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे रस्त्यांना ओढे नाल्यांचे स्वरूप आले आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास, तापोळा या डोंगरी भागात सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.  रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 


रायगडमध्येही मुसळधार


रायगडमध्येही काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील ढालघर फाटा जवळील असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपात प्रचंड पाणी साचल्यामुळे पेट्रोल पंपाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. या भागात पाणी साचल्यामुळे या पाण्याचा प्रवाह मुंबई गोवा महामार्गावर  येत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रायगड जिल्ह्यात काल कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील काळ नदी सुद्धा आता दुथडी भरून वाहू लागली आहे. काळ नदीचे पाणी किनाऱ्यावर लागल्याने पुढील काही तासात पावसाचा जोर वाढल्यास नदी किनारपट्टी ओलांडून वाहण्याची दाट शक्यता आहे. काल झालेल्या झालेल्या मुसळधार पावसात माणगाव तालुक्यातील गोरेगाव लोणेरे विभागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नद्यांच्या पातळीत देखील वाढ झाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या