Kolhapur Police : राज्यात होत असलेल्या पोलीस शिपाई आणि चालक भरती (Maharashtra Police Recruitment) प्रक्रियेतून बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आलं आहे. राज्यभरातून उच्चशिक्षित पोलिस भरतीत उतरल्याची माहिती समोर येत असतानाच कोल्हापुरातही अवघ्या 24 जागांसाठी झालेल्या भरती प्रक्रियेत डाॅक्टर, इंजिनिअरसुद्धा रांगेत दिसून आले. कोल्हापुरात (Kolhapur News) फक्त 24 जागांसाठी झालेल्या भरतीमध्ये शारीरिक चाचणीमध्ये जवळपास 1457 उमेदवारांची यशस्वी चाचणी करण्यात आली. मात्र, यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले उमेदवारसुद्धा शिपाईपदासाठी रांगेत दिसून आले.
कोल्हापुरातील भरती प्रक्रियेमध्ये 1457 उमेदवारांची चाचणी झाली असून 363 अपात्र ठरले 1314 उमेदवार गैरहजर राहिले. जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी एकूण 3134 उमेदवारांना बोलवण्यात आले होते. त्यापैकी केवळ 1 हजार 820 उमेदवार हजर राहिले. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर तसेच हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण घेतलेले उमेदवारही होते. शुक्रवारी शेवटच्या दिवशी महिला आणि माजी सैनिकांचे शारीरिक चाचणी झाली. पात्र उमेदवारांची केवळ शारीरिक चाचणी झाली असून गुण आणि लेखी परीक्षेसंदर्भात पुढील महिन्यात स्पष्टता येण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र एकाच वेळी लेखी परीक्षा होणार असल्याने राज्य सरकारकडून नियोजन सुरू आहे.
एका जागेसाठी तब्बल 100 अर्ज दाखल
दरम्यान, संपूर्ण राज्यात (Maharashtra Police Recruitment) पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याला विभागून जागा मिळाल्या आहेत. राज्यात एकूण 18 हजार 331 पोलिस शिपाई आणि चालक पदासाठी भरती होत आहे. या जागांसाठी राज्यभरातून तब्बल 18 हजार 331 पदांसाठी 18 लाख 27 हजार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. राज्याचा विचार केल्यास एका जागेसाठी 100 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील भीषण बेरोजगारीचे स्पष्ट होत आहे. राज्यात गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात भरती प्रक्रिया पार पडली तेव्हा एका जागेसाठी 50 ते 70 च्या घरात अर्ज दाखल होत होते. यावरून राज्यात दिवसागणिक किती बेरोजगारी वाढत चालली आहे याचेच हे द्योतक आहे.
दुसरीकडे, राज्यात होत असलेल्या पोलिस भरतीत गैरप्रकार आणि उमेदवाराची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी अत्यंत पारदर्शकपणा राबवण्यात येणार आहे. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या प्रत्येक चाचणीचं व्हिडिओ रेकाॅर्डिंग केलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या