Raigad News : गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात (Konkan)जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. यावेळी वाहतूक कोंडीची कोणतीही समस्या येऊ नये यासाठी मुंबई-गोवा हायवेवरील (Mumbai-Goa Highway) अवजड वाहतूक ही बंद ठेवण्यात येणार आहे. 


'गणेशोत्सव' हा कोकणी चाकरमान्यांचा साजरा होणारा सर्वाधिक मोठा उत्सव आहे. यानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे येथील बहुतांश चाकरमानी हे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील आपल्या मूळ गावी येत असतात. यामुळे, गणेशोत्सवापूर्वी सुमारे आठवडाभरापासूनच मुंबई-गोवा हायवेवर वाहनांची वर्दळ सुरु असते. तर, वाहनांच्या वाढत्या संख्या आणि अवजड वाहनांमुळे अनेक वेळा तासनतास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. 


यामुळे, गणेशोत्सवापूर्वी 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर, गणेशभक्तांचा प्रवास सुखरुप होण्यासाठी महामार्ग पोलीस सुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत.  


कोणकोणत्या वाहनांना बंदी?
त्यातच, राज्य परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या वाहनांचा प्रवास विनाअडथळा आणि वेळेत होण्यासाठी मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 1915 मधील तरतुदींचा वापर करुन महाराष्ट्र शासन या आदेशाद्वारे सार्वजनिक हितास्त पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी पनवेल ते सिंधुदुर्गवरुन होणारी रेतीचे ट्रक, ट्रेलरची तसेच वाहनांच्या वाहतुकीबाबत आदेश जारी केले आहेत.  ज्या वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे अशी जड अवजड वाहनं, ज्यामध्ये ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर इत्यादी वाहनांवर ही बंदी लागू असेल.


ही वाहनं वगळली
अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. 


यंदा निर्बंधाशिवाय गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार
दोन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर यंदा गणेशोत्सव निर्बंधाशिवाय साजरा होणार आहेत. या वर्षी गणेश मूर्तीच्या उंचीवर कोणतीही मर्यादा नसेल. तसेच गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या म्हणून एक खिडकी योजना राबवली जाणार आहे.  गणेशोत्सव मंडळांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसंच हमी पत्र देखील न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील कराव्यात. पीओपीच्या मूर्तींबाबत एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल. गणेशोत्सवासाठी राज्यभर एक नियमावली राहील.


संबंधित बातमी


Mumbai-Goa Highway च्या चौपदरीकरणाचा 12 वर्षांपूर्वी निर्णय; काम अजूनही अपूर्णच, मुंबई-सावंतवाडीपर्यंतच्या रस्त्याची सध्याची अवस्था