Tamhini Ghat Accident : ताम्हीणी घाटात स्विफ्ट डिझायर कार दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात वाशिम जिल्ह्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये एकूण 6 तरुण होते. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले. विदर्भातून पर्यटनासाठी कोकणात आलेल्या तरुणांचा अशा पद्धतीने अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 


मयत पर्यटकांमध्ये ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड यांचा समावेश असून या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण यांचा समावेश आहे. हे सर्व वाशिम जिल्ह्यातील आहेत. 


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील 6 तरुण प्रवास करत असलेली स्विफ्ट डिझायर कार ताम्हीणी घाटात आली असता अपघात होऊन कार खोल दरीत कोसळली. यावेळी कार दरीत पलट्या खात दरीच्या मधोमध अडकली. याबाबत माहिती रायगड पोलिस आणि आपत्कालीन व्यवस्थापनाला मिळाली.


यावेळी त्यांनी कारमधून प्रवास करणाऱ्या 6 पर्यटकांपैकी जखमी अवस्थेतील 3 पर्यटकांना शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले, तर दुर्दैवाने या कारमधील अन्य तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. मयत पर्यटकांमध्ये ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड यांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण अशी नावे आहेत. हे सर्व वाशिम जिल्ह्यातील आहेत. त्यांना साळूंखे रेस्क्यू टिमच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.  त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.