रायगड : आम्हाला जेसीबीखाली चिरडले तरी नव्या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोधच राहील असा आक्रमक पवित्रा रायगड जिल्ह्यातल्या नागोठाणे परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी घेतला आहे. स्थानिक भूमिपुत्रांनी रिलायन्स कंपनीच्या नव्या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे. 


नागोठाणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडलगत नवीन प्रकल्पाची निर्मिती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकल्पाबाबत येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि शेतकरी वर्गाने या प्रकल्पाला विरोध केला आहे. 


स्थानिकांवर वारंवार अन्याय


यासंबंधी बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले की, या  प्रकल्पाचे फायदे आणि तोट्यांविषयीची माहिती देखील आमच्यापासून लपवली जात आहे, शिवाय स्थानिकांना या कंपनीपासून मिळत असलेल्या वागणुकीचा पूर्वइतिहास पाहता वारंवार आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे असं मत स्थानिकांनी मांडलं. त्यामुळे आम्ही या नव्या प्रकल्पाला कदापी थारा देणार नाही.  


जेसीबीने चिरडले तरी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार


आमच्या शेतजमिनींना नव्या प्रकल्पापासून धोके असून सुपीक जमीन नापीक होणार आहे आमच्या शेतजमिनीचा योग्य निर्णय घ्या, मगच प्रकल्पाचा विचार करा. अन्यथा आम्हाला जेसीबीने चिरडले तरी मागे हटणार नाही  असा थेट इशाराच आता या प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. यावेळी शेकडो ग्रामस्थ या कंपनीच्या विरोधातील लढ्यात उतरले होते.


ही बातमी वाचा: