रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील (Raigad Mahad MIDC fire) केमिकल कंपनीत भीषण आग लागली. ब्लू जेट केमिकल कंपनीत (Blue Jet Healthcare company fire) लागलेल्या आगीत 11 कामगार अडकल्याची माहिती आहे. तर पाच कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गॅस गळतीमुळे (Gas leakage) आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. सकाळी 11 च्या सुमारास ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महाडचे प्रांताधिकारी दाखल झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड ही कंपनी रायगडमधील महाड MIDC मध्ये आहे. या कंपनीत सकाळी 11 च्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज स्फोटाचं असल्याचं क्षणार्धात लक्षात आलं. या स्फोटामुळे सगळीकडे धावपळ सुरु झाली. आधी गॅस गळती झाली की आधी स्फोट झाला याबाबत अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र स्फोट आणि गॅस गळती सुरु झाल्यानंतर, सर्वत्र आग पसरू लागली. यामध्ये कंपनीतील काही कर्मचारी अडकल्याची भीती आहे.
या स्फोटानंतर आगीने क्षणार्धात पेट घेत, सगळीकडे आग पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याशिवाय पोलीसही दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
या गॅसगळतीमुळे एका कामगाराची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.
11 जण अडकले, 5 जणांवर उपचार
दरम्यान, महाड आग दुर्घटनेमध्ये 11 जण अजूनही अडकून पडल्याची माहिती आहे. तर पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यापैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. या कंपनीत 57 कामगार काम करत होते. फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल आहेत, अशी माहिती महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली. या अग्नितांडवात कुणीही दगावल्याची पुष्टी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी केलेली नाही.
पालकमंत्री घटनास्थळी भेट देणार
दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेनंतर राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहेत. दुसरीकडे ज्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.