Thackeray Group Vs Congress : एकीकडे 'सामना'च्या अग्रलेखावरुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुरबूर दिसत असताना दुसरीकडे महाड विधानसभेच्या जागेवरुन ठाकरे गट (Thackeray Group) आणि काँग्रेसमध्ये (Congress) वाद पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या नेत्या स्नेहल जगताप (Snehal Jagtap) यांनी शनिवारी (6 मे) ठाकरे गटात प्रवेश केला. हे काँग्रेसला अजिबात रुचलेलं नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सूचना देऊनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश दिला ही त्यांची चूक आहे. काँग्रेस त्याजागी आपला उमेदवार देईल असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) मतभेद वाढू लागलेत का अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.


महाडमध्ये शनिवारी 6 मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत काँग्रेसच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. इतकंत नाही तर त्यांना शिवसेनेचे नेते (शिंदे गट) भरत गोगावले यांच्याविरोधात उमेदवारी देखील जाहीर केली. परंतु यावर काँग्रेस नाराज असल्याचं समोर आलं आहे. उद्धव ठाकरेंना सांगूनही त्यांनी स्नेहल जगताप यांना प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. पण काँग्रेस या ठिकाणी उमेदवारी देईल, असं असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 


पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चूक : नाना पटोले


"आम्ही उद्धव ठाकरेसाहेबांना सांगितलं की त्यांनी हे करु नका. पण त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत ही चर्चा करु, ती जागा काँग्रेस पक्षाची आहे, ती आम्ही लढू," अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.


महाविकास आघाडीतील सध्याचे वादाचे मुद्दे



  • संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे अजित पवारांचे खडे बोल

  • यावर मी फक्त शरद पवारांचं ऐकतो, असं संजय राऊत यांचं उत्तर

  • शरद पवारांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दात टीका

  • मग सामनातून शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

  • काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांचा ठाकरे गटात प्रवेश, महाडमधून उमेदवारीची घोषणा 

  • मविआतील पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याची काँग्रेसची नाराजी


VIDEO : Nana Patole on Uddhav Thackeray : ठाकरेंना सांगूनही स्नेहल जगताप यांना ठाकरे गटात प्रवेश दिला