मुंबई: आर्यन खान प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एनसीबी मुंबईचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना 22 मे पर्यंत अटक करु नयेत असे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तसेच वानखेडे यांच्या याचिकेवर सीबीआयने सोमवारपर्यंत उत्तर द्यावं असेही आदेश देण्यात आले आहेत. 


समीर वानखेडेंना शनिवारी सीबीआय कार्यालयात जाऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच वानखेडेंच्या याचिकेवर सीबीआयला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समीर वानखेडेंनी तपासात सहकार्य करावं, तूर्तास त्यांना अटक करणार नाही अशी ग्वाही सीबीआयने हायकोर्टाला दिली आहे. 


दरम्यान, सीबीआयच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये समीर वानखेडे यांनी मोठा खुलासा केला होता. समीर वानखेडे यांनी शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेत जोडली असून माझ्या मुलाची काळजी घे अशी विनंती शाहरुख खानने केली होती.


मुंबईतल्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. या याचिकेसोबत संभाषणाची प्रत जोडण्यात आली. सुट्टीकालीन कोर्टात ही याचिका दाखल केली. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीनं सुनावणीची मागणी केली होती. वानखेडेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली. विधिज्ञ रिझवान मर्चंट, आबाद पोंडा यांनी वानखेडे यांची बाजू मांडली. 


काय आहे आर्यन खान प्रकरण?


एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता.  आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. 


ही बातमी वाचा :