रायगड : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी भाजपसोबत हात मिळवणी करायला गेलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने नाकारले आहे. पेन नगरपालिकेच्या (Pen Municipal Council) निवडणुकीसाठी शिंदेची शिवसेना भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक होती, मात्र भाजपने त्याला सपशेल नकार दिला. यामागे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचं षडयंत्र असल्याचा आरोप शिंदेंचा आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेना पक्षाने पेण नगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत लढण्याचा निर्धार केला. मात्र हातमिळवणी करण्यास गेलेल्या शिंदे सेनेला भाजपने धुडकावून लावल्याचा प्रकार समोर आला.
Mahendra Dalvi News : भाजपचे नगरसेवक फोडल्याने नाराजी
पेण नगरपालिकेमधील बाजपचे काही नगरसेवक शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी फोडल्याने भाजप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती करायला स्पष्ट नकार दिला. मात्र शिवसेनेने त्यावरुन राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर निशाणा साधला.
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर आरोप
पेण विधानसभेचे स्थानिक भाजप आमदार रवी पाटील यांनी शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा युतीचा प्रस्ताव धुडकावून लावला. त्यानंतर संतापलेल्या महेंद्र दळवी यांनी त्याचे खापर सुनील तटकरे यांच्यावर फोडलं. सुनील तटकरे यांनीच यामध्ये खोडा घातला असून रायगडमध्ये उलटफेर करणारे ते एकमेव नेते असल्याचा आरोप महेंद्र दळवींनी केला.
एवढ्यावरच न थांबता आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. आम्ही महायुतीचा धर्म पाळण्यासाठी तयार होतो, मात्र राष्ट्रवादीच्या बालिश बुद्धी असलेल्या नेत्यांने आम्ही भाजप सोबत युती करणार असल्याचंं बोलून दाखवलं. त्यामुळे आम्ही आमचा विचार बदलल्याचं ते म्हणाले.
Sunil Tatkare On BJP : महेंद्र दळवींचा तटकरे-भाजपला इशारा
रायगड जिल्ह्यात तटकरे हे पुन्हा एकदा शिंदे सेनेला एकाकी पाडण्यासाठी भाजपसोबत आघाडी करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. परंतु त्यामुळे शिंदेंचे आमदार मात्र चांगलेच संतापल्याचं दिसून आलं.
भविष्यात महायुतीतील घटक पक्षांना त्याचा फटका बसला तर त्याचा दोष आम्हाला देऊ नका असा इशारा आमदार महेंद्र दळवींनी सुनील तटकरे आणि भाजपचे पेणचे आमदार रवी पाटील यांना दिला.
ही बातमी वाचा: