रायगड  : कोरोना काळात डॉक्टरांचं महत्त्व जसं सर्वसामान्यांना कळालं तसच, कोरोना कालावधीतच रुग्णांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि लूट करणाऱ्या डॉक्टरांचाही चेहरा समाजासमोर आला. त्यामुळे, वैद्यकीय क्षेत्राबद्दल असलेला सेवाभाव किंवा आपुलकीपणाचा भाव कमी झाल्याचं दिसून येतय. त्यातच, कधी स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा गर्भातील लिंगनिदान असेल, या घटनांमुळेही डॉक्टरांच्या भूमिका संशयास्पद राहिल्या आहेत. आता, रायगड (Raigad) जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांकडून महिलांच्या प्रसुतीमध्ये मोठ्या प्रमाणात सीजर करण्यात आल्याने त्यांची भूमिकाही शंकास्पद वाटत असून याप्रकरणी संबधित डॉक्टरांना (Doctor) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पुन्हा एकदा रुग्णालयांच्या आणि वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 


महाडमधील खासगी रुग्णालयांत 1,169 सीजर 20 महिन्यांत झाल्याचे समोर आलंय, या प्रसुतीसाठी गरोदर महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर विविध कारणे देऊन रुग्णांच्या नातेवाइकांना घाबरवले जाते. काही ठिकाणी 30 हजार तर काही ठिकाणी 60 हजारांपेक्षा अधिक रक्कम सीजर करण्यासाठी संबंधित रुग्णालयांकडून उकळण्यात येते. त्यामुळे महाड शहरातील डॉक्टरांची भूमिकादेखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. येथील शेख पॉली क्लिनिकमध्ये गत 20 महिन्यात 440 महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या, त्यातील 344 महिलांचे सीजर करण्यात आले आहे. तर, शहरातील निर्मल सुधा नर्सिंग होममध्ये तब्बल 1085 महिला प्रसुतीसाठी आल्या असता 676 महिलांचे सीजर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच, सुकाळे नर्सिंग होम हॉस्पिटल मध्ये 218 महिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आल्या असता 152 महिलांचे सीजर करण्यात आले आहे. शहरातील या तिन्ही हॉस्पिटलमध्ये मिळून 1 हजार 743 पैकी तब्बल 1 हजार 169 महिलांचे सीजर प्रसुतीदरम्यान करण्यात आले आहे. 


डॉक्टरांकडून कारणे दाखवा नोटीस


खासगी रुग्णालयाीतल महिलांच्या प्रसुतीदरम्यान होत असलेली सीजरची संख्या लक्षात घेता, महाड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे एका महिलेकडून तक्रार करण्यात आली होती. महिलेच्या या तक्रारीची दखल घेत चौकशी केली असता हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर, या रुग्णालयांना कारणे  डॉ.शंतनु डोईफोडे (अधीक्षक महाड ग्रामीण रुग्णालय) यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरांकडून अशाप्रकारे पैसे कमावण्याच्या हेतुने सीजर होत असेल तर वैद्यकीय क्षेत्रावरील विश्वास पुन्हा एकदा गमावत चालला असल्याचे दिसून येते. 


हेही वाचा


एकनाथ शिंदे अन् जितेंद्र आव्हाडांविरुद्ध मनसेचे उमेदवार; ठाण्यात 4 मतदारसंघात राज ठाकरेंचे शिलेदार